मुंबई : गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात पामुलगुटम आणि इंद्रावती या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले घारेगुडा गाव एरवीही पाण्याने वेढलेलेच असते. पावसाळ्यात तर बाहेरचा माणूस गावात येऊ शकणे जवळपास अशक्यच. अशात गावातल्या द्रुपदीच्या प्रसूतीवेदना कमालीच्या वाढत गेल्या. मदतीची शक्यता मावळलेली. सर्व आधार निराधार ठरल्यानं हताश झालेल्या द्रौपदीसाठी कृष्णानं जशी धाव घेतली होती, तशीच धाव या द्रुपदासाठी आरोग्य विभागाच्या सेविकांनी घेतली.

खडतर वाटेनं आणि बोलीभाषेत डोंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोटय़ा लाकडी होडीनं या आरोग्य सेविका गावात पोहोचल्या. द्रुपदाला त्यांनी डोंगातून भामरागड येथील प्रसूती केंद्रात आणलं. तिथे तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. तीन दिवसांनंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी महसूल आणि पोलिसांच्या बोटीतून बाळ-बाळंतिणीला सुखरूप घरी पोहोचतं केलं.

गडचिरोलीतीलच सिरोंचा तालुक्यातील झांगानुर प्राथमिक आरोग्य केंद्रावर असंच एक दुसरं बाळंतपण आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी केलं. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता. बाळंतपणात आईला रक्तस्राव झाल्यामुळे तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करणंही गरजेचं होतं. तथापि झांगानुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोबाइलचे नेटवर्कच नव्हतं. त्यामुळे कोणाशीही संपर्क होत नव्हता. तेथील डॉक्टरांनी काही किलोमीटरची पायपीट करत भ्रमणध्वनीवरून संपर्क शक्य होताच लघुसंदेश पाठवला. बाळाच्या आईला रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात होत होता. त्यामुळे तिला तत्काळ हलवणे आवश्यक होते. हे प्राथमिक आरोग्य केंद्रही पाण्याने वेढले होते. रस्त्याचा पत्ता नव्हता. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला तसेच १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिकाही बोलावली. पाण्यातून वाट काढत रुग्णवाहिका कशीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ पोहोचली. तेथील डॉक्टर आणि आरोग्य सेविकांनी बाळ आणि आईला रुग्णवाहिकेतून अहिरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी तत्काळ रक्ताची व्यवस्था केल्यामुळे बाळंतीणीचे प्राण वाचू शकले.

प्रामुख्याने पावसाळ्यात गडचिरोली, नंदुरबारसह राज्यातील अनेक दुर्गम भागांत आरोग्य सेवा देणं हे एक आव्हान असतं. तरीही आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि आरोग्य सेविका सर्व प्रतिकूलतेवर मात करीत या भागांत नियमित आरोग्य तपासण्या करतात. अशाच तपासणीतून द्रुपदाचे बाळंतपण तातडीनं करण्याची गरज लक्षात आली आणि ते आव्हानही पार पाडता आलं, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी सांगितलं. मुसळधार पावसातही आरोग्य सेविका आणि डॉक्टर सतत तैनात असल्यामुळेच अतिदुर्गम भागांत आम्ही चांगली आरोग्य सेवा देऊ शकलो, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं, तेव्हा त्यांचा सूर अभिमानानं भारावला होता.