आधुनिक उपचारासह पुनर्वसनावर भर

नागपूर : मनोरुग्णांना अद्ययावत उपचार मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने बेंगळुरूच्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि स्नायू विज्ञान संस्थेचे (निमहॅन्स) चार सॅटेलाईट केंद्र ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी या चारही प्रादेशिक मनोरुग्णालयांत सुरू करण्याचे ठरवले आहे. पहिल्या टप्यात ठाण्यात केंद्र

होणार असून त्याबाबत या अधिवेशनातच सामंजस्य करार व मंजुरी मिळण्याचे संकेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लोकसत्ताशी बोलताना दिले.

देशात मानसिक आजाराशी संबंधित आजारांवर संशोधन आणि या रुग्णांच्या पुनर्वसनावर अभ्यास करणारी निमहॅन्स ही सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेच्या विविध संशोधनातून रुग्णांना लाभ मिळणे शक्य आहे. त्यासाठी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निमहॅन्स या संस्थेची पाहणी करत त्याचे सॅटेलाईट केंद्र राज्यात सुरू करण्याचे ठरवले आहे. त्याबाबत संबंधित संस्थेसोबत बोलणी पूर्ण  झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात हे केंद्र नागपूर, पुणे, रत्नागिरीला केले जाईल.

काय होईल?

प्रस्तावित केंद्रात टेली मेडिसीनची सोय असल्याने अत्यवस्थ मनोरुग्णांवर उपचारासाठी बेंगळुरूतील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाईल. सॅटेलाईट केंद्र झाल्यावर बेंगळुरूचे तज्ज्ञ नित्याने चारही केंद्रांच्या संपर्कात राहून सातत्याने सुधारणा सुचवतील. त्यामुळे राज्यातील मनोरुग्णांच्या उपचाराचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव दूर होईल

निमहॅन्स संस्थेत रोज मानसिक आजाराशी संबंधित नवनवीन संशोधन व रुग्णांच्या पुनर्वसनाबाबत काम होते. त्यामुळे या संस्थेतील संशोधनाचा भाग असलेल्या उपचाराबाबतच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा राज्यातील मनोरुग्णांना येथे होणाऱ्या सॅटेलाईट केंद्राच्या मदतीने लाभ मिळू शकेल. या केंद्रांमध्ये सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय राहणार आहे. त्यामुळे मनोरुग्णांना हाताळण्याचे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावाच्या समस्येवर तोडगा निघेल.

– डॉ. दीपक सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य.