जत तालुक्यातील डफळापूर आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे एका महिलेला बसथांब्यावर जुळ्या मुलांना जन्म देण्याची वेळ आली. या घटनेची जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला निलंबनपूर्व नोटीस बजावली आहे.

डफळापूर (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्याऐवजी मिरजेला नेण्याचा सल्ला देणारे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.

मिरजेला जाताना संबंधित महिलेची डफळापूरच्या बसथांब्यावरच प्रसूती झाली होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई का करू नये, अशी विचारणाही डॉ. चोथे यांच्याकडे करण्यात आली आहे.

जत तालुक्यातील डफळापूरपासून दहा किलोमीटरवरील खेडय़ात राहणारी एक महिला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आली होती.  तिच्यासोबत तिचा पती व लहान मुलगा होता. आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होती. दरम्यान, तिची अवस्था पाहून परिचारिकेने केसपेपर काढून दिला.

केसपेपर घेउन ती आरोग्याधिकारी डॉ. अभिजित चोथे यांच्या कक्षात तपासणीसाठी गेली. या वेळी डॉ. चोथे यांनी या ठिकाणी प्रसूती होऊ शकणार नाही, तुम्ही मिरजेच्या रुग्णालयात जा, असे सांगितले. आरोग्य केंद्राकडे वाहन नसल्याचे कारण सांगून तुमचे तुम्ही जा,असेही या वेळी त्यांना सांगण्यात आले.

संबंधित महिला पायीच बसथांब्याकडे गेली. तेथे ती बसची वाट बघत प्रसूतीकळा सहन करीत बसून होती. तासाभरानंतर वेदना अस झाल्याने ती ओरडू लागली. या वेळी काही महिला मदतीसाठी पुढे सरसावल्या. गर्दीत एक परिचारिकाही होती. तिने पुढाकार घेतला आणि या बसथांब्यावरच संबंधित महिला प्रसूत होऊन जुळी मुले जन्माला आली. महिलेची प्रसूती झाल्यानंतर काहीं वेळाने रुग्णवाहिका बसथांब्यावर आली. यानंतर पुन्हा संबंधित महिलेला डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉ. चोथे यांना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे डॉ. गिरीगोसावी यांनी सांगितले.