पर्जन्यजल वाहिनीत रात्रीच्या वेळी बंद वाहिनी टाकून टँकर रिते

लोकसत्ता वार्ताहर

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी कारखान्यांनी घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी नवनव्या युक्त्या लढवल्या जात आहेत. औद्योगिक क्षेत्रातील सत्तर बंगला भागात असलेल्या एका विभागात बंद  कारखान्याजवळ घातक रसायनाने भरलेले टँकर  सांडपाणी जलवाहिनीत आणि पर्जन्यजल वाहिनीत रिते केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे नजीकच्या गावभागातील रासायनिक प्रदूषणात वाढ झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी  सत्तर बंगला भागातील डब्ल्यू झोनमधील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीतून घातक रसायन वाहून जात असल्याचे दिसून आले. पर्जन्यजल वाहिनीत सोडलेल्या रसायनाच रंग पिवळा आहे आणि अशा रंगाचे कोणतेही रसायन तारापूर औद्योगिक वसाहतीत तयार केले जात नाही. त्यामुळे हे रसायन नेमके कुठून आले याचा शोध घेतला जात आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने येतील उद्योगांवर दंडात्मक कारवाई केली असताना काही कारखानदाराकडून टँकरमधून रासायनिक सांडपाणी डब्ल्यू झोनमध्ये असलेल्या बंद कारखान्यात सोडले जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. बंद कारखान्यातून  वाहिनी टाकून  रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडले जात असल्याचे उद्योजकांनी तक्रारीत म्हटले आहे.

नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

एमआयीडीसीतील पर्जन्यजल वाहिन्या आजूबाजूच्या गावातील शेतजमिनीपर्यंत गेल्या आहेत. यातून जाणारे सांडपाण्यावर चाचणी केल्यानंतर ते पुढे सोडले जाते. परंतु बुधवारी दुपारी घडलेला प्रकार हा भयंकरच आहे, अशी प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य सांडपाणी वाहिनीत बेकायदा रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याच्या घटनांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

नाल्यात सोडलेल्या रसायनाबाबत त्या विभागाचे क्षेत्र अधिकारी गजानन पवार यांना तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
-मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ