करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता बाळगण्यासाठी पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. शतकांपासून सुरू असलेली ही परंपरा कायम राहावी, अशी इच्छा यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत देशाला आणि राज्याला करोनाच्या संकटातून मुक्त करण्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी विठुरायाला साकडे घातले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी यावेळी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना दिली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख वारकऱ्यांच्या वेषात होते. गळ्यात तुळशीचा हार व हातात वीणा घेऊन त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री मामा भरणे, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

पांडुरंगाच्या दर्शनानंतर जनतेला विशेष आवाहन करण्यात आले. पालखी सोहळ्याबाबत शासन स्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचाच असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे आणि विठूरायाचं नामस्मरण अन् पूजा घरातूनच करा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले.