राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांसाठी तीन प्रकारची विशेष रुग्णालयं सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना टोपे यांनी ही माहिती दिली.

करोनाच्या रुग्णांसाठी तीन प्रकारची रुग्णालये सुरू करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. यामध्ये पहिलं सामान्य कोव्हिड १९ रुग्णालय, दुसरं माइल्ड कोव्हिड १९ रुग्णालय तसंच तिसरं क्रिटिकल कोव्हिड १९ रुग्णालय सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण करोनाग्रस्तांपैकी ६१ टक्के रुग्ण केवळ मुंबईत असल्याची माहिती दिली. तसंच पुण्यात २० टक्के, ठाणे-पालघर या ठिकाणी ९ टक्के आणि इतर ठिकाणी उरवरित ठिकाणी १० टक्के करोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती त्यांनी दिली.

७० टक्के रुग्णांची प्रकृती चांगली
पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत कारण महाराष्ट्रात चाचण्या सर्वाधिक होत आहेत. ७० टक्के पॉझिटिव्ह रुग्ण यांची प्रकृती चांगली आहे. ५ टक्के रुग्णांची अवस्था ही थोडी चिंताजनक आहे. लॉकडाउन वाढवण्यात आला आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिस्त पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर हा कालावाधी आणखी वाढू शकतो असंही राजेश टोपे यांनी दिलं. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन तयार केले जातील असेही संकेत राजेश टोपे यांनी दिले.

आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा
आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. आरोग्य सेतू App हे सगळ्यांनी डाऊनलोड करावं अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत घेतली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. शेतीविषयक कामं आजही होऊ शकते. ग्रीन झोनसंदर्भातले निर्देश समोर आले तर लॉक इन मध्ये राहून काही भाग सुरु करता येतील का यावर विचार विनीमय सुरु आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.