राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.

उरलेल्या ११ जिल्ह्यांचं काय?

दरम्यान, निर्बंध हटवण्यात आलेल्या २५ जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. किंबहुना, तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचं काय?

या सर्व चर्चेदरम्यान, मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे. “मुंबईत करोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, या सगळ्याचं नियोजन करण्याचा भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील”, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

कोणते निर्बंध शिथिल होणार?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, त्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, खासगी कार्यालयांच्या वेळा अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.

थिएटर्स, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते. त्यासोबतच, एसी हॉलमध्ये गर्दी होऊ नये, लग्नात, राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचा जीआर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर काढला जाईल, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health minister rajesh tope announces relief in lockdown restrictions in 25 districts pmw
First published on: 29-07-2021 at 17:09 IST