News Flash

“…तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”, आईच्या निधनानंतर राजेश टोपेंनी केलं भावनिक ट्विट

आईच्या निधनानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली...

(फोटो सौजन्य - राजेश टोपे यांचं ट्विटर अकाउंट )

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल ( दि. 1 ऑगस्ट) निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या 74 वर्षांच्या होत्या. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण अखेर उपचारादरम्यानच शारदाताईंनी अखेरचा श्वास घेतला.

एकीकडे आईची काळजी घेणे आणि दुसरीकडे करोनाची लढाई लढणे अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून टोपे यांची सुरू होती. पण, आता आईच्या निधनानंतर त्यांनी आपल्या भावनांना ट्विटरद्वारे मोकळी वाट करून दिली आहे. “ती अजातशत्रु होती…एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही….सर्वांना प्रेम दिले… माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती….दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”, असं भावनिक ट्विट टोपे यांनी केलं आहे. याशिवाय, जालन्यातील अंबड तालुक्यात असणाऱ्या मूळगावीच आज (2 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता शारदाताईंवर अंत्यसंस्कार होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. करोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. काल रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. करोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. “आईला हृदयविकाराचा आणि मूत्रपिंडाचा आजार होता. एक वर्षाचा असताना तिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. रोज सकाळी तिची भेट घेतो. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा भेटतो. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे”, असे टोपे यांनी त्यांच्या आईची प्रकृती गंभीर झाली होती त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पार्थिवावर २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 9:32 am

Web Title: health minister rajesh tope emotional tweet after his mother passed away sas 89
Next Stories
1 गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकरांचा ओघ सुरू
2 कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण
3 मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा विखेंचा इशारा
Just Now!
X