News Flash

Corona: महाराष्ट्रात म्युटेशन आणि स्ट्रेन्स बदलतायत?; राजेश टोपेंनी व्यक्त केली शंका

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे (NCDC) नमुने पाठवण्यात आले आहेत

राज्यात एकीकडे करोना रुग्ण वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युटेशन आणि स्ट्रेन्समध्ये बदल होत असल्याची शंका व्यक्त केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे (NCDC) नमुने पाठवले असून अद्याप त्यांचं उत्तर आलं नसल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना याबद्दल माहिती देण्याची विनंतीदेखील केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“अलीकच्या काळात काही गोष्टी लक्षात येत आहेत. घरी विलगीकरणात असताना अचानक अनेकांना श्वास घेताना त्रास होत असून धाप लागत आहे. ती व्यक्ती वाईट स्थितीत रुग्णालयात येते. म्युटेशन, स्ट्रेन्स बदललेत का अशी मला शंका आहे. दक्षिण आफ्रिका, ब्राजील, युकेचा स्ट्रेन यांच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

“….तर तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं,” राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती

“आम्ही एनसीडीकडे नमुने पाठवले असून अद्याप उत्तर आलेलं नाही. आम्हाला तांत्रिक गोष्टी कळत नाहीत त्यामुळे तुम्हाला हा कोणता स्ट्रेन आहे सांगावं लागेल. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पुण्यात वेगळा आहे का? या सगळ्याचे नमुने आम्ही पाठवले आहेत. एनसीडीसीकडे याचे अधिकार आहेत. त्यांनी आपल्याला कळवलं पाहिजे. ही माझी जुनी मागणी असून याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आठवण करुन दिली. त्या अनुषंगाने उपचाराचे प्रोटोकॉल बदलायचे का हेदेखील ठरवता येईल,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे – राजेश टोपे

म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या रचनेत म्हणजे गुणसुत्रांत थोड्या प्रमाणात होणार बदल. लाखो लोकांच्या शरीरातून विषाणू पसरत असतो, तेव्हा असे बदल घडतात. अशा बदल झालेल्या विषाणूंना नवीन स्ट्रेन्स किंवा व्हेरियंट्स म्हणतात.

तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं
महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. ”महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून हा तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसात संपतील आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे,” असं ते म्हणाले.

“केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्दतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे,” अशी टीका राजेश टोपे यांनी केली.

“ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता असून आम्हाला जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी मागणी केली. ती त्यांनी गांभीर्याने नोंदवली आहे,” अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी यावेळी रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असं आवाहन खासगी डॉक्टरांना करत ११०० ते १४०० च्या वर विकू नये अशी विनंती केली. तसंच त्याची साठेबाजी करु नका असंही म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 5:45 pm

Web Title: health minister rajesh tope on mutation and strain in maharashtra sgy 87
Next Stories
1 खंबाटकी घाटातील वणव्यात रसायनाचा ट्रक आणि मोटार जळून भस्मसात
2 मोठी बातमी! नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार
3 प्रशासनातील संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा…; भाजपाचा नव्या गृहमंत्र्यांना टोला
Just Now!
X