करोना रुग्णांचा ग्रोथ रेट महाराष्ट्रात कमी आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्र सेफ झोनमधे आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. देशाचा ग्रोथ रेट ०.४ टक्के आहे तर महाराष्ट्राचा करोना ग्रोथ रेट हा ०.२ टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राच्या टीमनं दशलक्ष लोकांमागे चाचण्या वाढवण्यास सांगितलं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चाचण्या कमी झाल्या. परंतु त्या चाचण्या कमी होण्याचं प्रमाण तात्पुरतं होतं. आता आपण पुन्हा चाचण्यांची संख्या वाढवतोय. म्हणून रुग्णांची संख्याही पुन्हा वाढताना दिसतेय. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आम्ही यावर चर्चा केली असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी राजेश टोपे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीच्या काळात कमी झालेली करोना चाचण्याची संख्या पुन्हा वाढवणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी आपण दिवसाला आरटीपीसीआर आणि अँटीजन अशा दोन्ही मिळून साधारण ९० हजार चाचण्या करत होतो. परंतु, दिवाळीच्या काळात चाचण्यांची संख्या ६० हजारापर्यंत खाली गेली होती. चाचण्यांची संख्या पुन्हा ८० हजाराच्या आसपास पोहोचली आहे. मात्र, ही संख्या आता ९० हजारापर्यंत नेली जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

आपण ज्यांच्यामुळे करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे, अशा लोकांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. यामध्ये भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. उद्यापासून या सर्वांच्या वेगाने चाचण्या सुरु होतील. यासंदर्भातील अधिसूचना तातडीने काढण्याचे आदेश आपण दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येही हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.