गावाकडे येणाऱ्या पुणे आणि मुंबईतील लोकांकडे संशयातून पाहू नये. ते कोणी बाहेरच्या देशातून आलेले लोक नाहीत. ही बाब महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

आणखी वाचा- Coronavirus मी घरी थांबणार, करोनाला हरवणार हा संकल्प करा- राजेश टोपे

गावातील कोणीही अशाप्रकारची वागणूक करू नये. त्यांना गावात येण्यापासून अडवू नये. सर्वांशी माणुसकीनं वागलं पाहिजे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. लोकांनी सोशल डिस्टंस मेंटेन करून राहणं आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. शटडाऊनच्या अंतिम गोष्टी आपण केल्या आहेत. सर्व विभागांनी परिस्थितीचं अवलोकन केलं आहे. मास्क, आयसोलेश, क्वारंटाईन बेड किती आहेत याचा आढावा घेण्यात येत आहे. याव्यतिरिक्त महात्मा ज्योतिबा फुले योजनेत १ हजार रूग्णालयं आपल्याला सेवा देणार आहेत. सर्व अहवाल सोमवारी घेण्यात आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. करोनाचा सामना करताना अनेक कंपन्यांची मदत मिळाली आहे. राज्यातील कंपन्यांकडून अशीच मदत अपेक्षित आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- ‘परवानगीशिवाय येऊ नये’, कोकणात गावकऱ्यांनी घेतला चाकरमान्यांचा धसका; गावाबाहेर प्रवेशबंदीचे बोर्ड

संचारबंदी लागू केल्यानंतरही आज मंडईमध्ये गर्दी झाली होती. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्स मेंटेन करावं असं आवाहन त्यांनी केलं. आज संचारबंदी असताना धार्मिक स्थळांमध्ये गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. सर्व धर्मगुरूंनीही लोकांना आवाहन करावं, एक दूत म्हणून त्यांनी काम करावं, अशी विनंती त्यांनी केली. तसंच डॉक्टरांनी ओपीडी बंद करू नये. रूग्णासाठी त्यांनी तत्पर राहावं आणि आपल्या कर्मचारी वर्गालाही बोलवावं, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच मी घरी थांबणार, करोनाला हरवणार असा आपण संकल्प करावा, असंही ते म्हणाले.