राज्यात स्वाइन फ्लूवर झपाटय़ाने नियंत्रण मिळविण्यात येत असून, प्रारंभी टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात न आल्यामुळेच रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभाग सचिव डॉ. सुजाता सोनिक यांनी सांगितले. नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई यासारख्या बडय़ा शहरांमधील परिस्थिती आता आटोक्यात असून, स्वाइन फ्लूसदृश्य रोगाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांनी प्रवास टाळत सार्वजनिक रुग्णालयांमध्येच औषधोपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सोनिक या दोन दिवस नंदुरबार जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असून, जिल्ह्य़ातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचा त्या आढावा घेत आहेत. यावेळी त्यांनी स्वाइन फ्लूच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली विभाग आणि जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि चिंचपाडा प्राथमिक आरोग्य केद्राची पाहणी करत नंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील सुविधांची माहिती घेतली. या वेळी अनेक वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. गेल्या १९ दिवसांत जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १९ बालकांचा मृत्यू झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.  देशात महाराष्ट्र माता आणि बालमृत्युबाबत दुसऱ्या क्रमांकावर असून, नंदुरबारसारख्या जिल्ह्य़ांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज सौनिक यांनी व्यक्त केली. येत्या महिला दिनापासून राज्यात महिला आणि बालकांसाठी एक नवीन अभियान हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही सौनिक यांनी दिली.
नंदुरबार आरोग्य विभागात सध्या वर्ग-१ ची अनेक पदे रिक्त असून, ती लवकरच भरली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्र सरकारनेही तंबाखू विरोधी कायद्याचा मसुदा तयार केला असून, लवकरच तो मंत्रिमंडळाच्या संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. केद्राकडून निधी येण्यास विलंब झाल्याने औषध खरेदी रखडली होती. परंतु, आम्ही सर्व प्रशासकीय पूर्तता करुन ठेवल्याने कुठेही औषधांचा तुटवडा झाला नाही. ज्या ठिकाणी औषध नसेल तेथे स्थानिक पातळीवरच औषध खरेदीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले.