सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आरोग्य यंत्रणेतील २७३ पदे रिक्त आहेत. डोंगराळ व जंगली भागात आरोग्य यंत्रणेच्या या रिक्त पदांमुळे लोकांना उपचाराविना जीव गमवावे लागतात. शिवाय जिल्ह्य़ातील २२ वैद्यकीय अधिकारी अनधिकृतरीत्या गैरहजर असूनही त्याचा लोकप्रतिनिधींना थांगपत्ताही नाही. अपघात किंवा लेप्टोसारखे रुग्णांना गोवा, कोल्हापूर व बेळगावसारख्या शहरांत हलविण्याची नामुष्कीही वेळोवेळी आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आरोग्ययंत्रणा बेजबाबदार, बेफिकीरपणे हाताळली जात असतानाही जबाबदार लोकप्रतिनिधी मतदारांसाठी झटत नसल्याचे बोलले जाते. अपघातात किंवा लेप्टो, डेंग्यूसारख्या आजारांत रुग्णांचा जीव जात असतानाही अधिकाऱ्यांची पाठ थोपटणारे काही लोकप्रतिनिधी पाहून समाजातील जागृत लोकांनी तिरस्कारही व्यक्त केला आहे.
जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे जाणून घेऊन अभिनव फाऊंडेशनचे अध्यक्ष, पत्रकार ओंकार तुळसुलकर यांनी पाठपुरावा करूनही यंत्रणा दाद देत नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या जनहित याचिकेनंतरही आरोग्य यंत्रणेने कागदी घोडे नाचवून रुग्णांना फसविण्याचा प्रकार चालविला असल्याची टीका केली जात आहे.
सिंधुदुर्गात लेप्टोमुळे रुग्ण दगावत असल्याचे गेल्या काही वर्षांत उघड होऊनही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७४ पदे रिक्त आहेत. आरोग्य यंत्रणेत प्राथमिक, ग्रामीण आरोग्य केंद्रापासून उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयापर्यंत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मिळून तब्बल २७३ पेक्षाही अधिक पदे रिक्त आहेत.
सिंधुदुर्गात तज्ज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने अपघात, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसारखे रुग्ण गोवा बांबूळी, कोल्हापूर व बेळगांवसारख्या रुग्णालयात तातडीने हलवावे लागतात. या रुग्णांना या ठिकाणी नेतानाच रुग्णांचे निधन होते किंवा वेळीच उपचार झाले नसल्याने रुग्णांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे बोलले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सावंतवाडी, कणकवली उपजिल्हा रुग्णालय, ओरोस सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्य़ात सात ग्रामीण रुग्णालयांत रिक्त पदे आहेत, तसेच जिल्ह्य़ातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत.
मुंबई-गोवा या राष्ट्रीय  महामार्गावरील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, बालरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंगत्व, नेत्रचिकित्सक अशी पदे रिक्त आहेत.
या महामार्गावर कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तसेच ओरोस जिल्हा रुग्णालय येते. या ठिकाणी पदे रिक्त असल्याने लोकांचे हाल होतात. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा आणि एकूण पंचवीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पन्नास खाटांच्या शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन आणि अन्य मिळून सोळा पदे रिक्त आहेत. शिरोडा सागरी मार्गावर रुग्णालय आहे.
कणकवली, सावंतवाडी व शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सतरा व कर्मचाऱ्यांची मिळून सत्तर पदे रिक्त आहेत. ओरोस जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी बावीस व कर्मचारी मिळून १४० पदे रिक्त आहेत.
जिल्ह्य़ातील सातही ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे दहा वैद्यकीय अधिकारी अनधिकृतरीत्या गैरहजर आहेत. जिल्हा परिषदेची ११ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील चार, जिल्हा रुग्णालयातील सात, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे एक असे जिल्ह्य़ातील २२ वैद्यकीय अधिकारी अनधिकृतरीत्या गैरहजर आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या आरोग्य यंत्रणेचा हा सावळा गोंधळ पाहून रुग्ण खासगी डॉक्टरांची महागडी सेवा घेत आहेत असे सांगण्यात येते.