नवी दिल्ली येथे संशोधनाच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सहभाग राहणार असून आरोग्य शास्त्रातील नाविण्यपूर्ण संशोधनासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे ५० हजाराची दोन विशेष पारितोषिक दिले जाणार नसल्याचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी अधिसभेच्या बैठकीत जाहीर केले.
आरोग्य विद्यापीठ अधिसभेची या वर्षांतील दुसरी बैठक विद्यापीठाच्या चरक सभागृहात झाली. यावेळी डॉ. जामकर यांच्यासह डॉ. शेखर राजदेरकर,  डॉ. के. डी. गर्कळ आदी उपस्थित होते.
संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाने मागील वर्षी पुणे येथे ‘इनोव्हेशन २०१३’ परिषदेचे आयोजन केले होते. यंदा कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि आयसी ४ सी यांच्यातर्फे १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत संशोधनावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जामकर यांनी दिली.
समाजातील विविध घटकांनी केलेल्या संशोधनास प्रसिध्दी व प्रोत्साहन मिळण्यासाठी आंतर संस्थात्मक सर्वसमावेशक संशोधनासाठी अशा प्रकारच्या संशोधनावरील परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य शास्त्र शाखांमधील नाविण्यपूर्ण संशोधनासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे ५० हजार रुपयांची दोन विशेष पारितोषिके देण्याची घोषणा त्यांनी केली. अधिसभेत विद्यापीठाचा २०१४ च्या वार्षिक अहवालास मान्यता देण्यात आली.