महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर दि. ६ जुलैला सुनावणी होणार आहे. तशी नोटीस संबंधितांना बजावण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने वरिष्ठ पातळीवरून व्हीप बजावत शिवसेनेचे नगरसेवक सचिन जाधव यांना मतदान करण्याविषयी आदेश दिला होता. मात्र मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले, किशोर डागवाले, सुवर्णा जाधव व वीणा बोज्जा या चारही नगरसेवकांनी हा व्हीप धुडकावत राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मतदान केले.
पक्षादेश डावलल्याबद्दल या चौघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, यासाठी या कायद्यानुसार ते रद्द करण्याची मागणी एका अर्जाद्वारे करण्यात आली आहे. त्यावर विभागीय महसूल आयुक्तांकडे दि. ६ जुलैला सुनावणी होणार आहे. ही प्रकिया सुरू झाल्याने मनपा वर्तुळाचे लक्ष त्याकडे लागले आहे.