चंद्रपूर येथील माधवबागच्या वतीने रोगमुक्त नागरिकांचा सन्मान करण्यासाठी उद्या, रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे हृदयरोग, मधुमेह विजयोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती माधवबाग चंद्रपूरचे संचालक डॉ. लक्ष्मीनारायण सरबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्या रुग्णांनी हृदयरोग, मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा या आजारांना आहाराचे पथ्य, जीवनशैलीत बदल व डॉक्टरांचे मार्गदर्शन यांच्या साहाय्याने परतवून लावले आहे. त्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले. या रोगमुक्त लोकांकडून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधवबागचे रिसर्च हेड डॉ. राहुल मंडोले व औषध निर्मिती प्रमुख डॉ. प्रतिण गुंडवार उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात समाजसेविका डॉ. भारती आमटे, आमदार किशोर जोरगेवार आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम नि:शुल्क असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.