गेल्या आठवडाभरापासून विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होत असून नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, अमरावती व गोंदिया हे जिल्हे होरपळून निघत आहेत. विदर्भात आठवडाभरात उष्माघाताने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांत उष्माघाताने आजारी असलेल्या रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे.
विदर्भात चंद्रपूर, नागपूर व वर्धा जिल्ह्य़ांत तापमान ४७ अंशाच्या पुढे नोंदविण्यात आले. तापमानाने शनिवारी नागपुरात ४७.३ अंश से. टप्पा गाठला असून गेल्या ११ वर्षांतील हे सर्वाधिक तापमान आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वसामान्यांसह पशुपक्ष्यांनाही उष्णतेचा फटका बसला आहे.
अमरावती जिल्ह्य़ात बापोरी येथील सुरेश संपत ठाकरे (५२) व देवगाव येथील कौशल्या मडावी (७५) यांचा उष्माघातााने मृत्यू झाला. तर बडनेरा व नवाते भागात दोन अनोळखी मृतदेह सापडले. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे.
शहरातील मेडिकल व मेयो रुग्णालयात उष्माघात आणि गॅस्ट्रोचे रुग्ण उपचार घेत आहेत.  शहरात सक्करदरा भागात गोदामाजवळ एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. कॉटनमार्केट भागात एक ४० वर्षीय अनोळखी रिक्षाचालक रिक्षातच मृतावस्थेत आढळून आला. लकडगंज भागात वाहतूक पोलिसांच्या बूथजवळ ६० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. अजनीतील कुंजीलालपेठेत एक ६० वर्षीय इसम मृतावस्थेत आढळला. वर्धा मार्गावरील पांजरी येथे एका २८ वर्षीय तरुणाचा, विश्वकर्मानगरात एक, धरमपेठ खरे टाऊनमध्ये दोन आणि वाडीमध्ये एक मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शहरातील सीताबर्डी, गिट्टीखदान व नंदनवन भागात पाच अनोळखी मृतदेह सापडले. या सर्वाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाचाही कहर, परभणी अंधारात
मराठवाडय़ाच्या अनेक भागांत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत वादळी वारे आणि अवकाळी पाऊसाने कहर केला आहे. उस्मानाबाद, उमरगा आणि परंडा या शहरांसह तालुक्यांना गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले. अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले तर अनेक फळबागाही भुईसपाट झाल्या. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले असून ओढय़ा-नाल्यांना पूर आल्याने अनेक भागांतील रस्ते वाहतूक शनिवारी सकाळपर्यंत ठप्प होती. मिरजेत १३० तर सांगलीत १२० मिलिमीटर पावसाची नोंद अवघ्या पाच तासांत झाली. शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे परभणीच्या अध्र्याअधिक भागाचा वीजपुरवठा रात्रभर बंद होता. त्यामुळे नागरिकांचे उकाडा व डासांमुळे मोठे हाल झाले.

उत्तर प्रदेशात संतापाचीही लाट
लखनऊ : उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट तीव्र झाली असून अलाहाबादमध्ये शनिवारी ४८.३ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदले गेले. उष्णतेच्या लाटेतच भारनियमनाची भर पडून वीजपुरवठा कित्येक तास खंडित झाल्याने लोकांमध्ये संतापाचीही लाट उसळली असून त्यातून राज्याच्या काही भागांत वीजकंपन्यांच्या कार्यालयात जाळपोळ सुरू झाली आहे. लखनऊ वीजकेंद्रावर लोकांनी हल्ला चढविला आणि तेथील कर्मचाऱ्यांनाही तब्बल १८ तास ओलीस ठेवले. भारनियमनामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रे व पाण्याचे पंपही बंद पडल्याने संतापलेल्या लोकांनी वीज कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले आहे. गोंडा, गोरखपूर येथेही वीज उपकेंद्रांना आगी लावण्यात आल्या. ही जाळपोळ विझविण्यासाठी अग्निशामक जवानांचीही तारांबळ उडत आहे.