तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे

सोलापुरातील तापमानाचा पारा यंदाच्या उन्हाळ्यात सोमवारी उच्चांकी स्वरूपात ४४.३ अंश सेल्सियसपर्यंत मोजण्यात आले. गेल्या एप्रिलमध्ये २६ आणि २८ तारखेला अशाच स्वरूपाचे वाढीव तापमान मोजले गेले होते. त्यानंतर चालू मे महिन्यातही तापमान उच्चांकी झाल्याचे दिसून आले. सकाळी आठपासूनच उन्हाचे चटके जाणवत असताना वाढीव आणि असह्य़ तापमानाची चाहूल सोलापूरकरांना मिळाली होती. अंगाची लाही लाही करणारा यंदाचा उन्हाळा कधी एकदाचा संपतो, अशी भावना सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या मार्चपासून उन्हाचे चटके बसत आहेत. त्यात गेल्या एप्रिलमध्ये वाढ होत गेली. २६ एप्रिल रोजी तर ४४.३ अंश सेल्सियस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी म्हणजे २८ एप्रिल रोजी त्याचीच पुनरावृत्ती जाणवली. त्या दिवशीही ४४.३ अंश सेल्सियस तापमान मोजण्यात आले होते. अगोदरच उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात जाणवत असताना उन्हाळा अधिकच असह्य़ ठरू लागला आहे. जीव कासावीस करणाऱ्या प्रचंड उष्म्यामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत.

मागील आठवडाभर तापमान ४२ अंशांपर्यंत स्थिर होते. त्यात काल रविवारी वाढ होऊन ४३.८ अंशांपर्यंत तापमान मोजण्यात आले होते. सोमवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आठपासून उष्णताची दाहकता जाणवत गेली. उन्हाचे चटके भल्या सकाळपासूनच बसायला सुरूवात झाली. दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर उन्हाच्या झळा प्रकर्षांने जाणवत होत्या.  रस्त्यावरून जाताना उन्हाच्या झळा अधिकच त्रासदायक वाटत होत्या. त्यामुळे दुपारी बराच वेळ  सार्वजिक वाहतूक मंदावली होती. काही रस्त्यांवर वाहतूक बऱ्याच अंशी रोडावली होती. घरात विद्युत पंखेदेखील काम करेनासे झाले होते. तर काही भागात विजेचा लपंडाव चालल्यामुळे उष्णतेचा त्रास अधिकच जाणवत होता. घरात आराम करीत असतानादेखील घराबाहेरील उन्हाच्या झळा जाणवत होत्या. सोलापुरात गेल्या एप्रिलनंतर चालू महिन्यात सोमवारी पुन्हा उष्णतेची लाट अनुभवाला आली.