वेधशाळेच्या माहितीनुसार १ मे पर्यंत लाट

नांदेड : वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार १ मे पर्यंत मराठवाड्यात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.

नांदेडमध्ये वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रोज कमाल तापमानात वाढ होत असल्याने याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. सोमवारी नांदेडमध्ये ४५.५ इतक्या सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यात नांदेड शहर ‘हॉट सिटी’ म्हणून उदयास येत असल्याचे दिसते. मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी या शहरांमध्ये व नांदेडमध्ये एकसमान तापमानाची नोंद करण्यात आली. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४५ अंशापेक्षा पुढे गेल्याने मे कसा काढावा, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरश बेजार झालेले आहेत. दुपारच्यावेळी उष्ण लहरींमुळे नागरिकांचे अंग भाजून निघत आहे. घरात देखील उष्ण लहरींचा प्रभाव जाणवत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

मार्च व एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला नांदेडमधील तापमान ४० अंशांपर्यंत स्थिर होते; परंतु गेल्या आठ दिवसात तापमानात दररोज वाढ होत गेली आहे. ४२-४३ व पुढे ४४ अंशांवर पारा स्थिर होता. मागील तीन दिवसांपासून ४५.५ या रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली. हाच पारा पुढे १ मे पर्यंत जैसे थेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

वाढत्या तापमानामुळे शेतशिवारे ओस पडली असून पशुपालकांची त्यांच्या जनावरांचे आरोग्यही वाढत्या तापमानामुळे खालावत चालल्याने चिंता वाढली आहे.