आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर लोटला. दर्शनासाठी सहा रांगांतून मंदिरात जाण्याची सोय करण्यात आली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
मालवण तालुक्यातील मसुरे-आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीमातेचा लौकिक सर्वदूर पसरला असल्याने यात्रेसाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवीली होती. भाविकांची गर्दी पाहता यंदा दर्शनासाठी सहा रांगा करण्यात आल्या होत्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, शालिनी ठाकरे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार नीलेश राणे, नीतेश राणे, खासदार हुसेन दलवाई, अभिनेता सुशांत शेलार, माजी आमदार शिवराम दळवी, आमदार विनायक राऊत यांच्यासह लोकप्रतिनिधी, नगरसेवक, चित्रपटसृष्टीतील कलाकार, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. व्ही. आय. पी. भाविकांना स्वतंत्र लाइन असल्याने गर्दी भासत नव्हती.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने मनमोहित करणारी मुलांची माळ देवीच्या गाभाऱ्यात मांडण्यात आली होती. सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात आले. गाभाऱ्यात ओटय़ा भरण्यासाठी नियोजन करून दर्शनासाठी सहा रांगा करण्यात आल्या होत्या.
 मंदिराभोवती व मंदिरात क्लोज सर्किट कॅमेऱ्याद्वारे सुरक्षा व्यवस्था कार्यरत होती. आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. राजकीय पक्षांनी भाविकांची पाण्याची सोय केली होती. राजकीय पक्षांच्या बॅनरयुद्धात विविध प्रकारचे स्टॉलही लाखो रुपयांची उलाढाल करत होते.
राजकीय पक्षांच्या गर्दीमुळे भाविकांनी भल्या पहाटेच रांगा लावून सुलभ दर्शन घेण्याचा मार्ग स्वीकारला होता. अनेक भाविक राजकीय नेते गेल्यावर संध्याकाळी दर्शनासाठी गर्दी करत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देवीच्या दर्शनामुळे सर्वानाच त्यांचे आकर्षण होते.
आंगणेवाडी जत्रोत्सवास लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवून देवीचे दर्शन घेतले. मुंबईहून सर्वाधिक भाविक आले होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यासह अन्य प्रदेशातूनही भक्तांनी दर्शविलेली उपस्थिती लक्षणीय ठरली. रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी गर्दी होती.