News Flash

रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले

उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई-पुण्यातील पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई-पुण्यातील पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, आक्षी, नागाव, किहिम, काशिद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, माथेरान या पर्यटन केंद्रांवर पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे बहुतांश पर्यटन स्थळांवरील किनारे पर्यटकांनी गजबजल्याचे पाहायला मिळते आहे.
विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळींच्या बागा, हिरवी वनराई, गड-किल्ले, लेण्या यांचे पर्यटकांना नेहमीच अप्रूप राहिले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात गोव्यापाठोपाठ कोकणही पर्यटकांसाठी फेव्हरेट डेस्टिनेशन बनत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा आता संपल्या आहेत. अशातच होळी, धूलिवंदन, गुड फ्रायडे आणि त्यानंतर लागून आलेला चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी यामुळे राज्यभरातील विविध भागांतून पर्यटकांचा ओघ कोकणच्या दिशेने होण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारेही सध्या पर्यटकांनी गजबजले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमी भुरळ घालत असतात. अशातच मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथून तीन ते चार तासांत रायगड जिल्ह्य़ातील पर्यटन केंद्रांवर पोहोचणे सहज शक्य असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
मांडवा, आवास, किहिम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागांव, काशिद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वरचे किनारे सध्या हजारो पर्यटकांनी गजबजून गेले आहेत, तर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माथेरानमध्येही देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील हॉटेल व्यावसायिक, कॉटेजेस यांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.
गेल्या पंधरा दिवसांत अलिबाग येथे १० ते १२ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे, तर मुरुड आणि नागाव परिसरातही जवळपास ८ ते १० हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. माथेरानमध्ये पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी ग्रीन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. देशविदेशांतील कलाकार या पर्यटन महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हिरवागार निसर्ग आणि मनोरंजनाची दुहेरी मेजवानी पर्यटकांसाठी इथे उपलब्ध झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत माथेरानमध्ये दिवसात १० ते १२ हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाले आहेत. दिवेआगर, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन येथील किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील पर्यटन उद्योगाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र सध्या अनुभवायला मिळते आहे.
रायगडबरोबरच रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकाणातील जिल्ह्य़ांमध्ये देखील पर्यटक जात आहेत.
या जिल्ह्य़ांमध्ये जाण्यासाठी रायगडमधूनच जावे लागते. त्यामुळे रायगडात मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते आहे. खारपाडा ते वडखळ, वाकण फाटा ते कोलाड नाका आणि इंदापूर ते माणगाव या पट्टय़ात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. तळकोकणात गेलेले चाकरमानी आणि पर्यटक जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात परतीच्या प्रवासाला लागणार आहेत.
त्यामुळे वाहतूक कोंडीची ही समस्या आणखीन उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तळकोकणातून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2016 12:13 am

Web Title: heavy crowd at raigad beaches
Next Stories
1 केळी निर्यातीच्या संधीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
2 वैद्यकीय महाविद्यालयांत क्षमता समान मात्र, पदे असमान
3 दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी युती अंधारात