रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फटका नाही

ओखी वादळाचा रायगड जिल्ह्य़ातील आंबा पिकावर मोठा परिणाम झाला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे यामुळे मोहर गळून पडला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. फळांचा राजाचे जास्त उत्पादन होते त्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मात्र फार काही फटका बसलेला नाही, ही मात्र चोखंदळ ग्राहकांसाठी समाधानाची बाब ठरणार आहे.

रायगड जिल्ह्य़ात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापकी १४,५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार  मेट्रिक टन येवढे उत्पादन मिळते. साधारणपणे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते, फलधारणा झाल्यानंतर ९० दिवसांत आंबा तयार होत असतो. मात्र ज्या बागांमध्ये झाडांवर कल्टर प्रक्रिया केली जाते तसेच झाडांची योग्य निगा राखली जाते. त्या बागांमध्ये आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासूनच सुरू होते. तर जानेवारी अखेपर्यंत हा आंबा बाजारात येतो. त्यामुळे या आंब्याला चांगला भावही मिळत असतो. अशाच आंबाबागांना ओखी वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कारण या बागांमध्ये आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी फलधारणाही झाली आहे. पण वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे हा मोहर आणि फळ गळून पडण्यास सुरुवात झाली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. दुसरीकडे दमट हवामान आणि पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर त्याचा मोठा फटका आंबा उत्पादनावर होणार आहे

पण ज्या बागांमध्ये अद्याप मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, तिथे या पावसाचा फारसा परिणाम होणार नाही, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. मात्र बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागायतदारांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. सोमवार मंगळवारी असणारा ओखी वादळाचा प्रभाव बुधवारी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. त्यामुळे पीक परिस्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांना वाटतो आहे.

रायगड जिल्ह्य़ाच्या तुलनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही. तिथे फारसा पाऊसही पडलेला नाही. त्यामुळे या दोन प्रमुख आंबा उत्पादक जिल्ह्य़ात ओखीचा फारसा परिणाम जाणवणार नाही. वादळामुळे मोहराला आलेली फुले गळून पडली आहे. तर सुपारीच्या आकाराच्या फळांची गळती झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर आंब्यावर बुरशीजन्य आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे तिहेरी फटका बागायतदारांना बसू शकतो. बाजारात लवकर दाखल होणारा आंबा यामुळे संकटात सापडणार आहे.   – डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार