रत्नागिरीत आज पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकणातल्या सिंधुदुर्ग भागातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार येत्या चोवीस तासात विजा कडाडून पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, मुंबई उपनगरे, नागपूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे या ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

वायू वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. यंदा मान्सून चांगलाच लांबणीवर पडला. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये पाऊस झालेलाच नाही. फक्त कोकणात बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे. त्यामुळे बळीराजाही चिंतेत आहे. अशात आता येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तो बरसला आणि तसाच सुरू राहिला तरच दिलासा देणारं चित्र निर्माण होईल.