पेणमधील गणेशमूर्ती बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात सध्या कारागीर गर्क आहेत. पेण परिसरातील साडेसहाशे गणेशमूर्ती कारखान्यांतून या वर्षी जवळपास १५ लाख गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून, या व्यवसायातून या वर्षी जवळपास ४० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
  पेणमधील घराघरांत गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. सुरुवातीला पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय अलीकडच्या काळात पेण तालुक्यातील जोहे, हमरापूर, बोरी आणि दादर परिसरात पसरला आहे. आज तालुक्यातील विविध भागांतील साडेसहाशे गणेशमूर्ती कारखान्यांत गणेश मूर्ती बनवण्याचे काम बारा महिने सुरू असते. यातून जवळपास तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
 या वर्षी या कारखान्यांमधून १५ ते १६ लाख गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. राज्याबाहेर जाणाऱ्या ६० टक्के गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत. पेणमधून मॉरिशस, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्ये २० हजारांच्या आसपास गणेशमूर्ती रवाना करण्यात आल्या असल्याचे कारखानदारांनी सांगितले.
  कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा तीस टक्के वाढ झाली आहे. मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग आणि काथ्यांचा समावेश आहे. सातत्याने वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने यात भर घातली आहे, तर कुशल आणि अकुशल कारागिरांच्या पगारात वाढ झाल्याने यंदा गणेशमूर्ती महागणार असल्याचे पेण गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी सांगितले.
   गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अडचणीत भर घातली आहे. शाडूच्या मूर्ती सुकवण्यासाठी मूर्तिकारांना तारेवरची कसरत करावी लागली असल्याचे किशोर हजारे यांनी नमूद केले. मूर्ती ओल्या राहिल्याने रंगकामाला उशीर झाला आहे. त्यामुळे वेळेवर गणेशमूर्ती पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी स्पष्ट केले.