भंडाऱ्यात छत कोसळून तिघे ठार; नांदेड जिल्हय़ात ५ जण वाहून गेले

प्रतिनिधी/ वार्ताहर : नागपूर, गोंदिया, गडचिरोली, नांदेड

पुनरागमनानंतर रौद्र रूप धारण केलेल्या पावसाने विदर्भ व मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांत हाहाकार माजवला असून गेल्या ४८ तासांत या भागांत १० जणांचा बळी गेला आहे. पावसामुळे छत कोसळून भंडारा जिल्ह्य़ातील राजेदहेगाव येथे तिघांचा मृत्यू झाला.  नांदेड जिल्हय़ात सर्वाधिक पाऊस पडला असून येथे पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा तर हिंगोलीत दोन जणांचा मृत्यू झाला.

नागपुरात एक आठ वर्षीय मुलगा पाण्यात वाहून गेला. गडचिरोलीत मृत्यूच्या दाढेतून दोघांची सुटका करण्यात आली. नागपूर जिल्हय़ातील उमरेडसह मौदा, रामटेक या तीन तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून मौदा तालुक्यातील ‘सांड’ आणि ‘सूर’ नदीला पूर आल्यामुळे तारसा हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. नागपूर तालुक्यात ३२ विभागांत अतिवृष्टी झाली आहे.

भंडारा जिल्ह्य़ातील जवाहरनगर परिसरातील राजेदहेगाव येथे घराचे छत कोसळून पती-पत्नीसह मुलगी ठार झाली. ही घटना आज मंगळवारी उघडकीस आली. सुकरू दामोदर खंडाते (३२), सारिका सुकरू खंडाते (२८) व सुकन्या सुकरू खंडाते (३) अशी मृतांची नावे आहेत. खंडाते कुटुंब राजेदहेगाव येथील पोलीस पाटील मधुकर ढोबळे यांच्याकडे रोजंदारीवर शेतीकाम करायचे. ते मूळचे नागपूर जिल्ह्य़ातील पारशिवनी तालुक्यातील निलज खंडाळा येथील होते.

दुसऱ्या घटनेत नागपुरातील हमीदनगर परिसरात राहणारा आठ वर्षीय अदनान शकील कुरेशी हा सकाळी घराजवळच खेळत होता. पावसामुळे पिवळी नदी तुडुंब भरली आणि नदीवरील वांजरा पुलावर देखील पाणी आले. या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आणि खेळत असतानाच या पाण्याच्या लाटेसोबत अदनानदेखील वाहून गेला.

मराठवाडय़ात सर्वदूर हजेरी लावली. ४३२ पैकी ९० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस पडला असून येथे पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा तर हिंगोलीत दोन जणांचा मृत्यू झाला. विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून हिंगोली आणि नांदेड जिल्ह्य़ात काही घरांची पडझड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील वडोदबाजार, बनोटी आणि लिंबाची चिंचोली येथे अतिवृष्टी झाली. सोमवारच्या दिवशी नांदेड जिल्ह्य़ात दोन जण वाहून गेले. नायगाव तालुक्यात चौघे वाहून गेले.

हिमायतनगर तालुक्यातील पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला असून, नायगाव तालुक्यातील बरबडा येथे गंगाराम मारोती दिवटे, पार्वती गंगाराम दिवटे व त्यांची पाच वर्षांची मुलगी अनसूया हे चारचाकी गाडीतून गावी परतताना मांजरम-कहाळा येथील नाल्याला पूर आल्याने गाडी वाहून गेली. त्यात या तिघांचा मृत्यू झाला. तर विनायक बालाजी गायकवाड हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.

 मौदा तालुक्यात मोठे नुकसान

‘सांड’ आणि ‘सूर’ नदीला पूर आल्यामुळे तारसा हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले. तारसा गावातून वाहणाऱ्या सांड नदीवरील पुलावर देखील दहा ते बारा फूट पाणी आहे. तारस्याची मुख्य बाजारपेठ, दुकाने पाण्याखाली आहेत तर शेतात भात लावणी सुरू असल्याने शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मौदा तालुक्यातील एरोली येथेही सूर नदी तुडुंब भरून वाहात असल्याने गावात पाणी शिरले आहे. याच परिसरात बारशी, रेवराल, धांदला आदी गावांमध्येही पाणी शिरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

कार नाल्यात कोसळली

गडचिरोली येथील निखिल सत्यनारायण चेरकी व देवदत्त शरद धारो हे दोन युवक पहाटे चारचाकी वाहनाने गुरवळा गावाकडे जात होते. मार्गात लागलेल्या नाल्याला पूर होता. त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करताच कार वाहून जाऊ लागली. या वेळी दोघेही कसेबसे बाहेर निघाले. एक जण कारच्या छतावर चढला तर दुसरा झाडावर. ही माहिती मिळताच तहसीलदार डी. एस. भोयर, नायब तहसीलदार किरमे, दुरणकर, मडावी तसेच सहायक पोलीस निरीक्षक उदार, पोलीस उपनिरीक्षक सिसाळ, सहायक फौजदार सहारे, गौरकर, तिम्मलवार हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टय़ूब व दोराच्या साहाय्याने दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढले.