वसई, पालघर, वाडा, विक्रमगड तालुक्यांत पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, वाडा व विक्रमगड तालुक्यांत पावसाची संततधार सुरूच असून पालघर तालुक्याने पावसाची सरासरी गाठली आहे. इतर तालुक्यांतही गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

बुधवार दुपारी पावसाने अनेक ठिकाणी विश्रांती घेतली, मात्र गुरुवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर पकडला. गुरुवारी पालघर मंडळात २५८.८ मिलिमीटर, आगरवाडी मंडळात २०४, सफाळे मंडळ १३९, तारापूर मंडळ १३२, बोईसर मंडळ १२३ तर मनोर मंडळामध्ये ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबरीने वाडा तालुक्यात वाडा मंडळात १३४ मिलिमीटर, कंचाड मंडळात १६७, कोणे मंडळात ११५.८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पालघर तालुक्यात आतापर्यंत १,५९२ मिलीमीटर (१०७ टक्के) पावसाची नोंद झाली असून वसई तालुक्यात १,४९१ मिलिमीटर (८९ टक्के), डहाणू तालुक्यात १,०६७ मिलिमीटर (८७ टक्के), तलासरी तालुक्यात ९९५ मिलिमीटर (७३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. असे असताना विक्रमगड तालुक्यात ७१ टक्के, वाडा तालुक्यात ६८ टक्के, जव्हार तालुक्यात ६२ टक्के तर मोखाडा तालुक्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाला आहे. किनारपट्टीच्या भागामधील विहिरी व तलावांमध्ये जमिनीच्या पातळीला पाणी भरल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील पर्जन्यमान (मिलिमीटरमध्ये)

* वसई                    १०७

* जव्हार                  २२

* विक्रमगड             २६

* मोखाडा                 १६.३

* वाडा                      १२४.५

* डहाणू                    ३५.८

* पालघर                 १५९.३

* तलासरी                २०.३

* एकूण सरासरी       ६३.९

डहाणू, तलासरीतील अनेक गावांमध्ये पूरस्थिती

डहाणू : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डहाणू, तलासरीतील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर जीवनावश्यक वस्तूंचे आणि शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.

तलासरी व डहाणू तालुक्यांतील चारोटी, शेनसरी, वाणगाव, देदाळे, चिंचणी, बोर्डी, घोलवड, सायवनसह अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे डहाणू शहरातील मसोली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जमीनदोस्त झाली. अनेक ठिकाणी पुलांचा भराव वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. विजेचे खांब पडल्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले आहेत.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे मार्चपासून पाच महिने हाताला काम नसल्याने पावसाळ्यासाठी भात, धान्य साठवून ठेवले होते. मात्र तेही पावसात भिजून खराब झाल्याने आता खायचे काय, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

सुर्या, सुसरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा सामना करावा लागला आहे. डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. मात्र महसूल खात्याने पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

दारोठा नदीकाठचे गावपाडे पाण्याखाली

कासा : तलासरी तालुक्यात आणि परिसरात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे दारोठा नदीवरील कोचाई वडीपाडा येथील पूल पाण्याखाली गेल्याने कोचाई, बोरमाळ व आबेशेतगाव या गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाली होती.

मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन नदीकाठी असलेल्या गुरोडपाडा, पारसपाडा, वाडीपाडा, पाटीलपाडा व जुनावारपाडा येथील २५ ते ३० आदिवासींच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने भात, तांदूळ, कडधान्ये, कपडे भिजल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दुकाने, एक मोटरसायकल वाहून गेली. वडीपाडा येथील नदीकाठी एका घरात १०च्या सुमारास पाणी शिरल्याने दोन लहान मुलांसह महिला-पुरुष अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले नागरिक पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अडकून पडले. अखेर ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांचे जीव वाचविले. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले.

मुसळधार पावसाने तालुक्यातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर तसेच काही दुकानांमध्ये पाणी शिरले. बोरमाळ, अनवीर, सावरोली, संभा येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले, तर वादळी पावसाचा जोर इतका होता की उधवा, उंबरगाव मार्गावरील झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.