|| हर्षद कशाळकर
४५ दिवसांत १४ जणांचा मृत्यू, अतिउत्साही पर्यटकांपुढे प्रशासनही हतबल
अलिबाग : गेल्या दीड महिन्यांत रायगड जिल्ह्यात वर्षासहलीसाठी आलेल्या १४ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने अधोरेखित झाला आहे. सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे जिल्हा प्रशानाने वर्षा सहलींवर निर्बंध घातले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक वर्षासहलीसाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

कर्जत तालुक्यातील पाली भुतवली धरणावर वर्षासहलीसाठी आलेल्या मुंबईतील तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. पनवेल येथील कुंडी धबधब्यावर वर्षासहलीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पांडवकडा धबधब्यावर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यात नढाळ येथे पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील पोयजे येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला, तर नदी प्रवाहात पोहण्यासाठी उतरलेले दोघे वाहून बेपत्ता झाले.

पांडवकडा येथे अडकून पडलेल्या ११६ जणांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढले, तर भीमाशंकरच्या जंगलात ट्रेकिंगसाठी गेलेल्या आणि वाट भरकटलेल्या पाच जणांची नेरळ पोलिसांनी सुटका केली. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.

सहलीसाठी येणारे पर्यटक दगावण्याच्या घटना नवीन नाहीत. गेल्या तीन वर्षांत ५० हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यात प्रामुख्याने पनवेल, कर्जत, खालापूर, मुरुड आणि माणगाव पावसाळी पर्यटन स्थळांवरील दुर्घटनांचा समावेश आहे. या दुर्घटनांना पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत ठरतो आहे. दारू पिऊन पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परीस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहेत.

सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटना लक्षात घेऊन जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन केंद्रांवर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. सलग तीन वर्षे प्रशासनाकडून वर्षासहलींसाठी पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन प्रशासनामार्फत केले जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यात दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे.

उपाययोजना

पर्यटकांना स्थानिक परिस्थितीची माहिती देणारे सूचना फलक बसवणे. धरण, धबधबे, नद्या आणि तलावांमध्ये वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोहण्यासाठी सुरक्षित ठिकाणे निश्चित करणे, रिंग बोयाज, लाईफ जॅकेट आणि मदत व बचाव लागणारी सामुग्री सज्ज ठेवणे आवश्यक आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याच्या पातळीत अचानक वाढू शकते. याची जाणीव ठेवून पर्यटकांना सतर्क करणे गरजेचे आहे.

कर्जत, खालापूर आणि पनवेल येथील दुर्घटना लक्षात घेऊन, धोकादायक वर्षा पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र बंदी आदेश झुगारून पर्यटक पर्यायी मार्गांचा अवलंब करून या ठिकाणांवर दाखल होत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. पर्यटकांनी अतिवृष्टीच्या काळात वर्षासहलीसाठी येणे धोकादायक आहे. पर्यटकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. – निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड