|| दिगंबर शिंदे

सांगली-कोल्हापूरकरांना दिलासा; मिरजजवळ उपकरणाची उभारणी

सांगली : पावसाचा हंगाम सुरू झाला की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील नदीकाठी वास्तव्य करणाऱ्यांच्या मनात धास्ती सुरू होते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात अनेकांचे संसार कृष्णेने पोटात घेतले. ज्या जीवनदायिनी कृष्णामाईने अनेकांचे संसार फुलवले, तिचा कोप संसाराची राखरांगोळी करणारा ठरला. जिच्या काठच्या कसदार मातीने जगण्याला आधार दिला तीच वैरीण झाल्यासारखी वागली. या महापुराची व पूर्वसूचना जर मिळाली तर हानी कमी करता येऊ शकते. हे ओळखून केंद्रीय जल आयोगाने सांगली- कोल्हापूर सीमेवर मिरजेवरील अर्जुनवाड पुलावर ‘कर्ण’ उपकरण उभारले असून याद्वारे नदीतील पाणी पातळी, वेग, पावसाबरोबरच वाऱ्याची हालचाल कळण्यास मदत होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या प्रलयंकारी पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृष्णा नदीपात्राचा अभ्यास करत असलेल्या केंद्रीय जल आयोग पथकाच्या ताफ्यात आता ‘कर्ण’ हे अत्याधुनिक स्वयंचलित यंत्र दाखल झाले आहे. हाबळेडर नंतर दुसरे महत्त्वाचे उपकेंद्र म्हणून अर्जुनवाड पुलावर हे मोजमाप यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रामुळे पहिल्यांदाच थेट पुलावरून पाणी पातळीचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग पथकातील जल अभ्यासकांना बळ मिळाले आहे.

दोन वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात न भूतो न भविष्यती असा महापूर आला होता. दोन्ही जिल्ह्यांतील नदीकाठच्या शहरांसह, शेकडो गावे, वाड्या-वस्त्या पाण्याखाली होत्या. यावर्षीही चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शिवाय धरण पाणलोट क्षेत्रात मोसमी पूर्व पावसाने हजेरी लावल्याने नदीकाठचा पूरपट्टा पुन्हा एकदा हबकला आहे. महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने काही दिवसांपासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगांव जिल्ह्यातील केंद्रीय जल आयोगाची सर्व केंद्रे कृष्णा नदी व कृष्णा नदीस मिळणाऱ्या सर्व उपनद्यांची २४ तास पाणी पातळी मोजत आहेत.

केंद्रीय जल आयोगाची देशभरात शेकडो उपकेंद्र आहेत. पुणे विभागात कृष्णा नदीकाठी कराड, निपळी, वारंजी, तारगांव, नांद्र, सडोळी, अर्जुनवाड, कुरुंदवाड, तेरवाड आणि सदलगा ही दहा उपकेंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कृष्णा नदीचा उगम झालेल्या महाबळेश्वरपासून बंगालच्या उपसागराला नदी मिळत असलेल्या आंध्र प्रदेशापर्यंत अभ्यास केला जातो. यापैकी हाबळेडर हे महत्त्वाचे केंद्र असल्याने तेथे यापूर्वीच स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. सांगली, कोल्हापूर जिह््याला महापुराचा विळखा पडल्याने या भागासाठी मिरज, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अर्जुनवाड केंद्राला अतिमहत्त्व देण्यात आले आहे.

१९६९ साली स्थापन झालेल्या जलआयोगाच्या या केंद्रावर पाणी तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा कार्यरत आहे. पाण्याची पातळी, गती, उंची, खोली आदीचे मोजमाप प्रामुख्याने करण्यात येत आहे. मात्र यासाठी स्वयंचलित यंत्रणा नसल्याने पथकातील जल अभ्यासकांना रात्री-अपरात्रीच्यावेळी बोटींमधूनच नदीपात्रात उतरावे लागते. शिवाय रात्रीच्यावेळी नदीच्या पाण्यात थांबूनच पाणी पातळी, खोली, रुंदी, आद्रता, गती, दिशा आणि कमाल-किमान तापमान यासह पुलाजवळून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गाची माहिती नोंद करावी लागते.

अर्जुनवाड या उपकें द्रावर कनिष्ठ अभियंता रुपेशकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल साहाय्यक उद्धव गदू, राहुल डोंगरे, योगेश कोळी, गणेश डोंगरे हे जल अभ्यासक काम करीत आहेत. या सर्वांना कर्ण यंत्र हाताळणीचे प्रशिक्षणही दिले आहे. स्वयंचलित कर्ण यंत्राद्वारे नदीपात्राची माहिती नोंद होताच केंद्रीय जल आयोग पथकाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर त्याचा अहवाल दिला जातो. त्यानंतर पुणे, हैदराबाद आणि दिल्ली येथे वरिष्ठ विभागालाही अहवाल पाठविण्यात येतो. यंत्राद्वारे मिळालेल्या माहितीआधारे पूरपट्ट्यात असणाऱ्या पुढील गावांना धोका आहे का? धरणातून असाच विसर्ग सुरू राहिला तर पूर येऊ शकतो का? याबाबत सन्वयक चर्चा होते. त्यानंतर पुढील उपाययोजना राबविण्याबाबत तज्ज्ञांकडून निर्णय तातडीने घेण्यास मदत होणार आहे.

अभ्यासाची पद्धत

मिरज अर्जुनवाड पुलावर उभारण्यात आलेल्या यंत्राद्वारे नदीपात्राचा अभ्यास केला जातो. प्रथम पुलावरून रुंदी तपासली जाते. त्यानंतर यंत्र पाण्यात सहा मीटरपर्यंत नेऊन संपूर्ण नदीपात्राची खोली बघितली जाते. अर्जुनवाड पुलावर आठ मीटर अंतर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी निशाणी करण्यात आली आहे. यापैकी काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह मंदावत असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी यंत्र नेऊन पाण्याचा ताशी वेग पाहिला जातो. पुलाजवळ प्रति सेकंदाला किती क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाला? याची नोंद करून पुढील गावातील केंद्राला माहिती दिली जाते. पाण्याची गती आणि विसर्ग पाहून त्याचा पुढील भागात कोण-कोणत्या क्षेत्रात विस्तार होऊ शकतो याचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येतो. यामुळे पुढील भागातील लोकांना जागृत करण्याबरोबरच हानी टाळण्यास मदत होणार आहे.

उपयोग काय?

आता केंद्रीय जल आयोगाच्या पथकात ‘कर्ण’ हे अत्याधुनिक स्वयंचलित मोजमाप यंत्र दाखल झाले आहे. सदरचे यंत्र मिरज-अर्जुनवाड पुलावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाण्यात उतरून करावा लागणारा पाणी पातळीचा अभ्यास आता पुलावरूनच करता येणार आहे. दररोज सकाळी आठ ते दहा या दोन तासांतच या यंत्राद्वारे नदी पात्राची रुंदी, खोली, पाणी पातळी आणि प्रत्येक सेकंदाच्या विसर्गाची माहिती संकलित केली जात आहे. यंत्राद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे धरणापासून विसर्ग होत असलेल्या पाण्याचा किती वेगाने प्रवास सुरू आहे, याचीही माहिती तात्काळ मिळत आहे. परिणामी जल अभ्यासकांना या यंत्राद्वारे अगदी कमी वेळेत संभाव्य महापुराची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.