कोकणच्या उंबरठय़ावर पोचलेल्या मान्सूनच्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर आगामी ७२ तासांत मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
यंदा मुदतीपेक्षा लवकर आगमनाची तयारी असलेल्या मान्सूनच्या पावसाने पुन्हा एकवार शेतकऱ्यावर प्रतीक्षा करण्याची वेळ आणली आहे. मात्र गुरुवारपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी मध्यरात्रीनंतर रत्नागिरीसह जिल्ह्य़ातील लांजा, देवरुख, संगमेश्वर इत्यादी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हे वातावरण पुढील तीन दिवस कायम राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आगामी ४८ तासांत तामिळनाडूचा उर्वरित भाग, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश, मध्य अरबी समुद्र, कर्नाटक तसेच इशान्येकडील राज्यांपर्यंत मान्सून पोचण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील त्याच्या आगमनासाठी आणखी किमान दोन दिवस वाट बघावी लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
फणसाड धरणाच्या जॅकवेलचा गेटवॉल वर्षभर नादुरुस्त
मुरुड तालुक्यातील फणसाड धरणाच्या जॅकवेलचा गेटवॉल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे पंचवीस गावे पाण्यापासून वंचित झाले आहेत. गेटवॉल ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फणसाड धरणातून मुरुड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील काजूवाडी, बेलवाडी, बारशीव, भोईघर, टेबोर्डे, मांडला ग्रामपंचायत हद्दीतील महाळुंगे खुर्द, मांडला, अबिटघर, बारवई, चाफेवाडी, काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील डाकेली, वांदेली, पारगाण, ठाकूरवाडी, काकळघर, चिंचघर, काशिद ग्रामपंचायत  mh03हद्दीतील सर्वे, काशिद, चिकणी, बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर, सुरई, बोर्ली, आदिवसी वाडी, कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील कोर्लई, आदिवासी वाडी आदी सहा ग्रामपंचायतीतील पंचवीस गावांना पाणीपुरवठा होतो. परंतु या धरणाच्या जॅकवेलचा गेटवॉल नादुरुस्त झाल्याने या गावांना धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला असून पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात फणसाड धरणाच्या परिसरातील शेतीकरिता जॅकवेलचा गेटवॉल उघडण्यात आला होता तो परत बसविताना गेटवॉल नादुरुस्त झाला त्यामुळे त्या वेळी फणसाड धरणातील पाणी मोठय़ा प्रमाणात वाहून गेले. शासनाच्या संबंधित खात्याकडे नागरिकांनी सातत्याने लक्ष वेधले परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. फणसाड धरणाच्या जॅकवेल विहिरीचा गेटवॉल ताबडतोब दुरुस्त न झाल्यास येत्या पावसाळ्यात धरणाचे पाणी वाहून जाईल व पुढील वर्षीसुद्धा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना धरणाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती व्यक्त  होत आहे. फणसाड धरण अनेक वर्षे कार्यरत असून धरणात गाळ साचला असून गाळ काढणे जरुरीचे झाले असून त्यामुळे मुबलक पाण्याचा साठा धरणात राहून पंचक्रोशीतील गावांना पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे संबधित खात्याने धरणातील गाळ काढून घ्यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.