मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धो धो पाऊस पडला. वादळी वारे, मुसळधार पाऊस, हवेतील गारठा यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील जनजीवन गारठून गेले आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे येथे आठ इंचापेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाली. चोवीस तासांत भंडारदरा धरणात अर्धा टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे ६४४ दक्षलक्ष घनफूट पाण्याची भर पडली. कळसूबाईच्या पायथ्याजवळ असणारा वाकीचा लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागला. त्यामुळे कृष्णावंती ही प्रवरेची उपनदी दुथडी भरून वाहू लागली असून, कृष्णावंतीचे पाणी निळवंडे धरणात जमा होऊ लागले आहे.
गेल्या चार दिवसांपासून तालुक्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू आहे. मंगळवार दुपारनंतर पावसाचा जोर खूपच वाढला. वादळी पावसाने पश्चिम भागातील सहय़ाद्रीच्या पर्वत शिखरांना झोडपून काढले. या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विजेचे खांब पडले. तापमानात मोठय़ा प्रमाणात घट झाल्यामुळे कळसूबाई, हरिश्चंद्रगडाचा परिसर गारठून गेला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील पांजरे येथे आज सर्वाधिक म्हणजे २१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटघर (२०१ मिलिमीटर) व रतनवाडी (२०५ मिलिमीटर) येथे ही दोनशे मिलिमीटरपेक्षा अधिक पावासाची नोंद झाली. या पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठय़ाने दोन टीएमसीचा टप्पा ओलांडला. बुधवारी सायंकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा २ हजार ३८७ दशलक्ष घनफूट झाला होता. दिवसभराच्या बारा तासांतच ७४ मिलिमीटर म्हणजे ३ इंच पाऊस पडला. घाटघर, रतनवाडी, पांजरे परिसरात यापेक्षाही पावसाचा जोर अधिक असल्यामुळे बारा तासांतच धरणाच्या पाण्यात ३७७  दशलक्ष घनफुटाने वाढ झाली. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ९९५ दक्षलक्ष घनफूट झाला होता.
याच वर्षी पाणी साठवण्यास सुरुवात करण्यात आलेले मुळा नदीवरील िपपळगाख खांड धरण बुधवारी सकाळी भरून वाहू लागले. या धरणाच्या जलाशयात कोतूळ आणि बोरी येथील कोल्हापूर बंधारे बुडाले असून कोतूळ येथील मोठय़ा पुलावरही पाणी आहे. त्यामुळे अकोले-कोतूळ दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागत आहे.