News Flash

चिपळूणवर आभाळ फाटलं! अतिवृष्टीने भीषण स्थिती; २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती

रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण जलमय झालं आहे

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झालं आहे

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाने मुक्काम ठोकला असून, गेल्या २४ तासांत पावसाने कोकणात रौद्ररुप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं असून, अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत. यामुळे चिपळूनमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होते की काय या धास्तीने नागरिकांची झोपच उडाली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.

२६ जुलै २००५ ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यवधींची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या होत्या.

वाहतुकीवरही परिणाम

मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.

रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.

संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असून रामपेठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मारुती मंदिर देवरुख मार्गावर पाणी चढण्याची शक्यता आहे

खेड शहरात जगबुडी, नारिंगी नदीचे पुराचे पाणी शिरू लागले आहे

काजळी नदीला पूर आल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील बाजारपेठेत पहाटे दोन वाजल्यापासून पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सर्व साहित्य बाहेर घेण्यास सुरुवात केली आणि सर्व साहित्य सुरक्षितस्थळी नेले. आत्ताच्या घडीला बाजारपेठेत पाणी वाढत आहे, काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. सोमेश्वरकडे जाणार मार्ग बंद करण्यात आला आहे. हातीस, टेंभे येथेही पूरसदृश स्थिती आहे.

वाशिष्ठीच्या पुराचा कोकण रेल्वेला फटका

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि कामठे स्थानक दरम्यान वशिष्ठ नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 10:52 am

Web Title: heavy rain in chiplun causes fear in people ratnagiri sgy 87
Next Stories
1 रायगड: महाडमधील पूरस्थिती गंभीर, धोक्‍याचा इशारा; अनेक गावांचा संपर्क तुटला
2 मनधरणी?; पंकजा मुंडेंची चंद्रकांत पाटलांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात घेतली भेट
3 कोल्हापूरला महापुराचा धोका; एनडीआरएफच्या पथकांना पाचारण
Just Now!
X