जिल्ह्य़ात गुरुवारी सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. वसमत तालुक्यातील माळवटा मुरूंबा येथील हसीना बेगम शेख नासेरमिया (वय ४०) या महिलेचा अंगावर वीज पडल्याने शेतातच मृत्यू झाला. औंढा नागनाथ देवस्थानच्या व्यापारी संकुलावरील टिनपत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.
िहगोली शहरात सकाळी सातपासून दोन तास पाऊस झाला. त्यानंतर शहरात विश्रांती घेत जिल्ह्य़ाच्या सर्व भागांत वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील खुडज परिसरात गारांचा पाऊस पडला. औंढा नागनाथ तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला. औंढा नागनाथ संस्थानने टिनपत्र्याचे बांधलेल्या व्यापारी संकुलाचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले. कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यांत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. िहगोली शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
कर्जबाजारीपणा व नापिकीस कंटाळून कळमनुरी तालुक्यातील सिंदगी मगर येथे साहेबराव मगर (वय ४५) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. आखाडा बाळापूर पोलिसांत याची नोंद झाली.