मृगनक्षत्राच्या मुहुर्तावर बरसण्याची परंपरा कायम ठेवत रविवारी करवीरनगरीसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मृगावर आलेला पाऊस पुढेही कायम राहतो, अशी श्रद्धा असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर इचलकरंजी शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं आणि विद्युत खांब पडून घर आणि मोटारीचे नुकसान झाले. तर तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने म्हैस जखमी झाली. अनेक ठिकाणी झाडे तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.
जून उजाडला तरी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा मृगनक्षत्राकडे लागल्या होत्या. रविवारी शहरात सकाळपासून उष्मा जाणवत होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या कडकडाटासह सुमारे अर्धातास पाऊस सुरू होता.
तर या पावसामुळे इचलकरंजी येथील संजीवनी हॉस्पिटलजवळ लावलेली महेश मनोहर चाळके यांच्या चारचाकी गाडीवर झाड पडून काचा फुटल्या. नागरिकांनी मदतकार्य करून झाड आणि गाडी बाजूला केली. तर लिगाडे मळ्यातील मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे सदाशिव चव्हाण यांच्या घरावर झाड आणि विद्युत खांब पडल्याने घराचे नुकसान झाले. याचप्रकारे सीईटीपी प्रकल्पाजवळ तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन म्हैस जखमी झाली. वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी वीज मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील दूरध्वनी उचलला जात नसल्यानं नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. याचप्रमाणे शहरात अनेक ठिकाणी झाडे आणि विद्युत तारा तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.