यंदाच्या मोसमातील पहिले दोन महिने हुलकावणी देणारा मान्सूनचा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात चांगल्या प्रकारे बरसू लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी सुरुवातीलाच व्यक्त केला होता. तो अपेक्षेपेक्षा जास्त खरा ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जूनच्या तिसऱ्या आठवडय़ातील दमदार पावसामुळे महिनाअखेरीस समाधानकारक सरासरी गाठणे शक्य झाले. मात्र जुलै महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १ जूनपासून आजअखेर जिल्ह्यात एकूण सरासरी १४०८.४२ मिलिमीटर पाऊस झाला असून त्यापैकी जुलै महिन्यात जेमतेम ४०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या महिन्यात सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस न झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडय़ात चांगला पाऊस झाल्यास ही तूट भरून निघू शकेल. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भातलावणीवरही विपरीत परिणाम झाला आहे. नदी-नाले किंवा अन्य पाणी साठय़ांच्या मदतीने शेतकऱ्यांनी लावणीची कामे उरकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र निव्वळ पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीला मोठा फटका बसला आहे.