गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एका दिवसात २०० मिलीमीटर इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

कोकण आणि गोव्यामध्ये ५ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५ जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते. तर मध्य महाराष्ट्रात ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून ५ जुलैनंतर पाऊस कमी होत, जाईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

वाचा : https://www.loksatta.com/mumbai/mumbai-airport-runway-spicejet-flight-overshoots-heavy-rain-jud-87-1922987/

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळत असताना पालघर जिल्ह्यालाही पावसाने झोडपले आहे. त्यातच पालघरमधील काही नद्यांची धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसाचा परिणाम सामान्य जीवनावर तसेच परिवहनावरही झाला आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा, विरार. डहाणू, तलासरी, जव्हार आदी परिसरांमध्येही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्याही घटना घडल्या आहेत.