News Flash

कोकणातील जनजीवन विस्कळीत

शहरांत पाणी, वाहतूक ठप्प बाजारपेठांचे मोठे नुकसान

शहरांत पाणी, वाहतूक ठप्प बाजारपेठांचे मोठे नुकसान

कोकण किनारपट्टीवर गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे किंवा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून गेल्या २४ तासांत चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. खेड तालुक्यातील जगबुडी आणि चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे या नद्यांवरील पूल अधूनमधून वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली.

रायगड जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी पुराचे पाणी रेल्वे रुळांवर आल्यामुळे कोकण रेल्वेच्या काही गाडय़ा नजीकच्या रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या. तसेच पनवेल-मुंबई रेल्वे मार्गावरील गाडय़ा या मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रकही बिघडले.

राजापूर शहर आणि परिसरालाही पुराचा फटका बसला आहे. शनिवारी संध्याकाळी मात्र या तिन्ही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे बाजारपेठेतील पाणी ओसरले. पण जगबुडी आणि वाशिष्ठी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या.

चिपळूण शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील बाजारपेठ, नाईक कंपनी, मुरादपूर, शंकरवाडी, चिंच नाका, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मध्यवर्ती बस स्थानक, पेठमाप, जुना भैरी मंदिर, आदी विविध भागांत पाणी घुसले. बाजारपेठेतील काही दुकानदारांनी दुकानांतील वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्या. महापुराच्या भीतीने शेकडो लोकांनी रात्र जागून काढली. पेठमापला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा होता. दरम्यान, पुरामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात येऊ  नये यासाठी पालिकेत अधिकाऱ्यांचा जागता पहारा सुरू होता. आपत्कालीन यंत्रणा शहरात ठेवण्यात आली होती. तहसीलदार जीवन देसाई, नायब तहसीदार तानाजी शेजाळ व सहकाऱ्यांनी पुराची पाहणी केली. पाणी भरलेल्या ठिकाणच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला. चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे पुराचे पाणी आले होते. परिणामी या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास ती सुरळीत झाली. रात्री रस्त्यावर उभी केलेली अनेक वाहने अडकून पडली होती. खेर्डीत माळेवाडी, विकासवाडी, खतातवाडी, विठ्ठलवाडी आदी भागात पुराचे पाणी घुसले. नागरिकांना घरातून बाहेर पाण्याचे मार्ग बंद झाले होते. घरात पाणी भरण्याच्या भीतीने लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला होता. खेर्डी रेल्वे पुलाजवल शिवशाही बस पुराच्या पाण्यात अडकली होती. स्थानिक पदाधिकारी व तरुणांच्या साह्याने बस पाण्यातून ढकलत बाहेर काढण्यात आली. पुरामुळे चिपळूण, खेर्डी, परिसरात शाळांना सुट्टी देण्यात आली. यामुळे चिपळूणसह खेर्डीवासीयांच्या २००५ मधील महापुराच्या आठवणी जाग्या झाल्या.

चिपळूण बसस्थानक पाण्यात असल्याने वाहतूक खोळंबली. एस.टी.च्या १६३ फेऱ्या रद्द झाल्या, तर मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पूल वाहतुकीस बंद केल्याने महामार्गावरील वाहतूक रखडली. चिपळूण-कराड मार्गावरदेखील खेर्डीत पाणी आल्याने वाहतूक कोलमडली होती. चिपळूण बसस्थानकांत सुमारे तीन फूट पाणी होते. तर बसस्थानक ते चिंचनाका दरम्यानच्या मार्गावरही पाणी आले होते. परिणामी बसस्थानकातून एस.टी. बाहेर पडलीच नाही. येथील एसटी बसगाडय़ा शिवाजीनगर येथे हलवण्यात आल्या होत्या.

खेड-दापोलीलाही फटका

या पावसामुळे दापोली आणि खेड याही दोन तालुक्यांना फटका बसला. दापोलीत बांधतिवरे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. खेड-दापोली मार्गावरील नारिंगी नदीला पूर आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळपासून बंद आहे.

दरम्यान, खेडजवळ जगबुडी नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल शनिवारी सकाळी अकरा वाजता वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून हा पूल बंद करण्यात आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील दरम्यान, खेड नगर परिषदेने ध्वनिक्षेपकाद्वारे तसेच तीन वेळा भोंगे वाजवून नागरिकांना धोक्याची सूचना दिली होती. नगर परिषद कर्मचारी- अधिकारी, मदत ग्रुपचे कार्यकर्ते बोट तसेच अन्य साहित्याच्या मदतीने रात्रीपासून मदतकार्य करत होते. जगबुडी नदीचे पाणी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खेड बाजारपेठेत शिरले आणि सकाळी नऊपर्यंत ही परिस्थिती कायम होती. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी ओसरू लागले.

आगामी २४ तासांत पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने शहरातील पूरबाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत चिपळूण तालुक्यात सर्वात जास्त २३५ मिलिमीटर पाऊस पडला. त्याचप्रमाणे दापोली (२२७ मिमी), खेड (१९०) संगमेश्वर (१६६) आणि लांजा (१०४) याही तालुक्यांना पावसाने दणका दिला.

वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे गोवा महामार्ग बंद

वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रात्री मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. महामार्गावरील वाहतूक गुहागर बाह्य वळणमार्गे वळवण्यात आली होती. शनिवारीही दिवसाचा बराचसा वेळ वाशिष्ठी पूल वाहतूक बंद ठेवण्यात आला होता. परिणामी महामार्गावर अवजड वाहनांचा रांगा लागल्या होत्या. शनिवारी संध्याकाळी चिपळूणजवळ परशुराम घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली.वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रात्री मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. महामार्गावरील वाहतूक गुहागर बाह्य वळणमार्गे वळवण्यात आली होती. शनिवारीही दिवसाचा बराचसा वेळ वाशिष्ठी पूल वाहतूक बंद ठेवण्यात आला होता. परिणामी महामार्गावर अवजड वाहनांचा रांगा लागल्या होत्या. शनिवारी संध्याकाळी चिपळूणजवळ परशुराम घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 11:13 pm

Web Title: heavy rain in maharashtra mpg 94
Next Stories
1 ..अन् पश्चिम महाराष्ट्रातील नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला!
2 बेरोजगारीच्या समस्येवर ‘मुद्रा’ची मात्रा
3 “सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची मागणी”
Just Now!
X