News Flash

रायगड जिल्ह्यात पूरस्थिती

कोकण रेल्वे सेवाही विस्कळीत; महामार्ग वाहतूक थंडावली

माथेरानमध्ये ४३७ तर पेणला ४०० मिमी पाऊस, महाड, नागोठणे, रोहा, नेरळ परिसराला पुराचा तडाखा, कोकण रेल्वे सेवाही विस्कळीत; महामार्ग वाहतूक थंडावली

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्य़ातील सर्व नद्या दुथडी भरून वाहात असल्याने महाड, नागोठणे, रोहा, नेरळ परिसराला पुराचा तडाखा बसला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इंदापूर ते गोरेगाव दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली आहे. माथेरानमध्ये ४३७ तर पेण येथे ४०० मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यत सरासरी २१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे सावित्री, आंबा, कुंडलिका, उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पातळगंगा, भोगावती, काळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री नदीच्या पाण्यामुळे महाड शहरात मध्यरात्रीपासून पूरस्थिती निर्माण झाली. महाडकडून रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद होती. पोलादपूरमधील सावद, धारवली, वावे, हावरे, कालवली गावांचा संपर्क खंडित झाला होता. तर अंबानदीचे पाणी नागोठणे परिसरात शिरले. वाकण-पाली मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुधागड पाली येथील उन्हेरे, उद्धर, भेरव, वाफेघर, खवली गावांचा संपर्क तुटला होता.

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा पाझर तलाव धोकादायक स्थितीत आला असल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. उल्हास नदीने धोका पातळी ओलांडल्याने नेरळ परिसरातील अनेक गावांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. मुंबई-पुणे द्रुतगती यांना जोडणाऱ्या मार्गावरील सावरोली पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. माणगाव-श्रीवर्धन रस्त्यावर मोरबे पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. हेटवणे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे भोगावती नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याशिवाय काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, घरांची आणि गोठय़ांची पडझड होणे यांसारख्या घटना घडल्या. कर्जत येथील सेलू येथून २५ नागरिकांना, तर जामरूंग-सोलनपाडा येथील १५६ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रोहा तालुक्यातील आंबेवाडी ८४ जणांना स्थलांतरित करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील रामराज पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

महामार्ग वाहतूकही विस्कळीत 

मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. बोरघाटात सकाळच्या सत्रात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची गर्दी होती. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते इंदापूर दरम्यान खरवली गावाजवळ पाणी साचले होते. दुपारनंतर माणगावमधील कळंब गावाजवळ असलेल्या पुलाला पाणी लागल्याने महामार्गावरील वाहतूक नियंत्रित केली होती. या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. माणगाव तालुक्यातील कुंभे मोर्जिणे येथील रस्ता खचला. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली.

कोकण रेल्वे सेवेलाही फटका

कोकण रेल्वेलाही मुसळधार पावसाचा फटका बसला. कोकण रेल्वे मार्गावर इंदापूर ते गोरेगाव दरम्यान रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे जवळपास दीड तास या मार्गावरील गाडय़ा ठिकठिकाणच्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रत्नागिरी-दादर वीर स्थानकावर, दिवा-सावंतवाडी कोलाड स्थानकावर, मंगला एक्स्प्रेस करंजाडी स्थानकावर, तर मांडवी एक्स्प्रेस रोहा स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या. मालगाडी पाठवून चाचणी केल्यावर प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा उशिराने धावत होत्या.

४८ तास धोक्याचे

जिल्ह्यत येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. नद्यांची पातळी वाढली असल्याने किनारपट्टीवरील गावांना पुन्हा एकदा पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शासकीय यंत्रणा आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 11:13 pm

Web Title: heavy rain in maharashtra mpg 94 2
Next Stories
1 कोकणातील जनजीवन विस्कळीत
2 ..अन् पश्चिम महाराष्ट्रातील नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला!
3 बेरोजगारीच्या समस्येवर ‘मुद्रा’ची मात्रा
Just Now!
X