News Flash

रायगड जिल्ह्य़ात जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

| June 20, 2015 07:43 am

मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा तळा, मुरुड आणि अलिबाग तालुक्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे तीनही तालुके जलमय झाले असून विद्युतपुरवठा खंडित झाला.
गेल्या चोवीस तासांत अलिबाग येथे २०५ मिमी, पेण येथे १६० मिमी, मुरुड येथे २१० मिमी, पनवेलमध्ये १२६ मिमी, उरणमध्ये १७४ मिमी, कर्जतमध्ये ७६ मिमी, खालापूरमध्ये ८९ मिमी, माणगाव १०० मिमी, रोहा १५२ मिमी, सुधागड ११३ मिमी, तळा २२६ मिमी, महाड ४५ मिमी, पोलादपूर ३१ मिमी, म्हसळा १६७ मिमी, श्रीवर्धन १६५ मिमी, तर माथेरान येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली. तर शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
अलिबाग, मुरुड आणि तळा तालुक्यात सखल भागात पाणी शिरल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अलिबाग शहरातील बाफना बाग, चेंढरे, रामनाथ, तळकरनगर येथील परिसर जलमय झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील आंबेडकर चौक ते पीएनपीनगरकडे जाणारा रस्ता, महेश टॉकिजकडून तांबोळी हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता, आंबेडकर चौकातून रेवसकडे जाणारा रस्ता, चेंढरे बायपास, रामनाथहून तळकरनगरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेले. जलनिस्सारणाच्या सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या. तळकरनगर परिसरातील बहुतांश घरात पाणी शिरले. बुधवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्री उग्र रूप धारण केले. गुरुवारी पहाटेही पावसाचा धुडगुस सुरूच होता. दोन दिवसांत जवळपास ३०० मिमी पावसाची नोंद अलिबाग परिसरात झाली. याच वेळी समुद्राला मोठी उधाण आली. साडेचार मीटरच्या भरतीमुळे पाणी वाहून जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले. त्यामुळे हताशपणे घरादारांत शिरणाऱ्या पाण्याकडे पाहत राहण्याची वेळ अलिबागकरांवर आली. अलिबाग नगरपालिकेच्या नालेसफाई मोहिमेचा पुरता बोजवारा उडाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. याचा प्रत्यय मुरुड आणि अलिबागकरांना आला. मुरुडमध्ये बुधवारी रात्रीपासून, तर अलिबागमध्ये सकाळपासून विद्युतपुरवठा खंडित झाला. दुपारी तीननंतर काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना यश आले. मात्र काही भागांत विजेचा लपंडाव सुरू होता.
संततधार पावसाने नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. शेतजमीनही पाण्याखाली गेली होती. दरम्यान, येत्या ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नदी आणि समुद्रकिनाऱ्यावरील गावे आणि भूवैज्ञानिकांनी जाहीर केलेली संभाव्य दरडग्रस्त गावे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना तीन दिवस रजा न घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. तर कार्यालयप्रमुखांनी मुख्यालय सोडून जाऊ नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी सूचनाही जारी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2015 7:43 am

Web Title: heavy rain in raigad 3
टॅग : Heavy Rain
Next Stories
1 ‘भुजबळांची आज, तर उद्या अजित पवार, सुनील तटकरे यांचीही चौकशी’
2 पोलीस अधीक्षकांविरूद्ध कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सामूहिक रजेची धमकी
3 आयटीआय शुल्कवाढीविरोधात अभाविपची निदर्शने
Just Now!
X