वीजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने सोमवारी संध्याकाळी रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले.

गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात उकाडा कमालीचा वाढला असून रविवार-सोमवारी अनेक ठिकाणी वादशी वा-यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. हा अंदाज खरा ठरवत रविवारी संध्याकाळी उशीरा संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली या तालुक्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून वाहतूक विस्कळित होण्याचे प्रकार घडले. मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.

याच प्रकाराची सोमवारी संध्याकापुनरावृत्ती होत रत्नागिरी शहर व तालुक्यासह संगमेश्वर, चिपळूण, खेड याही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला. त्यापूर्वी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याचे उन होते. तसेच हवेत कमालीचा उकाडा जाणवत होता. संध्याकाळी मात्र मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाने हवेत सुखद गारवा आणला.

सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी भातपिकावर कीड-रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या पावसामुळे तो उडून जाण्यास मदत होईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र कमी मुदतीचे हळवे भात पिकवलेल्या शेतक-यांचे या पावसामुळे नुकसान होण्याचा धोका आहे.