सलग पाच दिवस सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी दुपारपासून पुन्हा जोर धरला असून आटपाडी व खानापूर या दुष्काळी तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात सर्वाधिक ५८ मिलिमीटर पावसाची नोंद विटा येथे झाली. आटपाडी तालुक्यातील आटपाडी व महाडिकवाडीसह मिरज तालुक्यातील खंडेराजुरी व आरग तलाव भरून वाहू लागले असल्याचे सुखद चित्र आहे.
हस्त नक्षत्राचे आता केवळ दोनच दिवस उरले असले तरी परतीच्या मान्सूनचा जोर अद्याप कायम आहे. विशेषत: जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव या तालुक्यात या पावसाने जोर धरला आहे. ग्रामीण भागातील शेतातील ताली तुडुंब भरल्या असून यामुळे पावसाचे पडणारे पाणी थेट ओघळीच्या माध्यमातून ओढा पात्रात येत आहे. दिवसातून दोन-दोन वेळा ओढय़ाला पूर येण्याचा प्रताप परतीच्या मान्सूनने केला आहे.
रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने मिरज शहराजवळ असलेला मालगाव ओढा दुथडी भरून नजीकच्या झोपडपट्टीत पाणी शिरल्याने महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची धावपळ उडाली. मिरजेच्या चाँद कॉलनी, म्हैसाळ वेससह अनेक भागात असलेल्या गुंठेवारी क्षेत्रात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. सांगलीतील काकानगर, शामरावनगर, मगरमच्छ कॉलनी आदी ठिकाणी रस्त्याअभावी नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे.
काल दुपारी वीज पडून विटय़ाच्या रेवानगर येथे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची-निमज येथे डोंगरावरून दगड घरंगळत येऊन अंगावर पडल्याने आक्काताई रूपनूर ही महिला दगावली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. रविवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सोमवारी दुपारपासून पावसाच्या मध्यम सरी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत हा पाऊस सुरूच होता.
आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद विटा येथे ५८ मिलिमीटर झाली असून अन्य तालुक्याच्या ठिकाणी नोंदला गेलेला पाऊस पुढीलप्रमाणे इस्लामपूर ११, पलूस १०, तासगाव १९, सांगली ५, शिराळा ५, मिरज ५.३, आटपाडी ४३, कवठेमहांकाळ १६.६, जत १५ आणि कडेगाव २१ मिलिमीटर इतका असल्याचे जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.