शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपून काढले आहे. जिल्ह्य़ातील अनेक भागांतील वीजपुरवठा अतिवृष्टीमुळे खंडित झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
संपूर्ण पावसाळ्यात अनुभवला नसेल असा पावसाचा जोर रायगडकरांनी दोन दिवसांत अनुभवला आहे. जिल्ह्य़ात गेल्या चोवीस तासांत सरासरी ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुरुड येथे म्हसळा येथे १७७ मिमी, श्रीवर्धन येथे १५३ मिमी, १५१ मिमी, रोहा येथे १२१ मिमी, माथेरान येथे ८३ मिमी, अलिबाग येथे ७२ मिमी तर उरण येथे ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळपासूनच अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, उरण यांसारख्या किनारपट्टीवरील भागात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. उर्वरित भागातही पावसाची संततधार कायम आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्य़ात सरासरी २२४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण जिल्ह्य़ातील सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत ७३ टक्के आहे. दरम्यान येत्या ४८ तासांत कोकण किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्य़ातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावर ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्र खवळलेला असेल.  मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.