|| दयानंद लिपारे

कोल्हापुरातील आरे गावातील नागरिकांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक

माणुसकीच्या नात्याने राज्यासह देशभरातून येत असलेली मदत लुटण्याच्या घटना घडत असताना कोल्हापूर जिल्ह्य़ातील आरे नावाच्या गावाने आदर्श भूमिका घेत पूरग्रस्त गावांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. ‘आम्हाला मदत मिळाली आहे, अन्यत्र गरजूंना पाठवा’ या आशयाचा फलकच गावाच्या सीमेवर लावला आहे. आरे गावच्या ग्रामस्थांच्या या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे.

येथील करवीर तालुक्यात तुळशी आणि भोगावती नदीच्या काठावर आरे गाव वसलेले आहे. कोल्हापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला या दोन्ही नद्यांना आलेल्या पुराने वेढले. संपूर्ण गाव पाण्याखाली बुडाले, गावातील सर्व तीन हजार लोकांचे अन्यत्र स्थलांतर करावे लागले. गावातील प्रत्येकाचाच घर-संसार, शेती-व्यवसाय या पाण्याने गिळंकृत केले. गावावर ओढवलेल्या या संकटामुळे अनेक ठिकाणांहून मदतीचे हात धावले. अन्नधान्य, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, कपडे, औषधे तातडीने लागणाऱ्या सर्व गोष्टी गावात आल्या. त्यामुळे गावाने वेशीवरच एक भलामोठा फलक लावला आहे. या फलकामध्ये म्हटले आहे की, आरे गावक ऱ्यांकडे पूरग्रस्तांसाठी येणारे अन्नधान्य, कपडे, वाणसामान पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तरी आपण आणलेल्या वस्तू इतर गरजू पूरग्रस्तांना द्याव्यात.

झाले काय? आलेली मदत, साहित्य गावाने एकत्रित करत त्याचे समन्यायी पद्धतीने वाटप केले. यासाठी त्यांना गावपातळीवर एका समन्वय समितीचीही स्थापना केली. या समितीने आलेल्या वस्तूंचा संच तयार करत घरोघरी त्याचे वाटप केले. जीवनावश्यक वस्तूंची ही गरज पूर्ण झाल्याने गावाने कृतज्ञ भावनेने आता मदत नाकारली आहे.

पुराच्या संकटात अनेक जण आमच्या मदतीला धावून आले. त्यामुळे आम्ही यातून सावरलो आहे. आता आम्हाला अन्न-धान्य, कपडे या प्रकारच्या मदतीची गरज नाही. ज्यांना अशी मदत करायची आहे, त्यांनी ती अन्य गरजूंना करावी. मात्र याशिवाय कुणाला मदत करायची असेल, तर गावाला आजही चारा, पशुखाद्य याची गरज आहे. पडलेली घरे बांधण्यासाठी मदत हवी आहे.    – साक्षी कुंभार, सरपंच, आरे