शनिवारी पहाटेपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वसई, विरार, साफळे, बोईसर, डहाणू, बोर्डी या भागांनाही पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे येथील सखल भागात पाणी साचले असून पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील लांब पल्ल्याच्या लोकल उशिराने धावत असल्या तरी उपनगरीय लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत.

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. तसेच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवूनच शाळा सोडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त पालघरमधून वाहणाऱ्या वैतरणा आणि सूर्या या प्रमुख नद्यांची पातळी वाढली आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. सूर्या नदीमधून या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात पावसाच्या सरी रात्रीपासूनच कोसळत आहेत. तर अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस चांगलाच वाढला आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने बॅकलॉग भरुन काढला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.