25 September 2020

News Flash

पहिल्याच मान्सूनने नगरकर सुखावले

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने गुरुवारी नगरकर सुखावले. शहर व परिसरात दुपारी चारच्या सुमारास तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोर ओसरल्यानंतरही बराच वेळ हलक्या सरी सुरू होत्या.

| June 19, 2014 03:01 am

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने गुरुवारी नगरकर सुखावले. शहर व परिसरात दुपारी चारच्या सुमारास तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोर ओसरल्यानंतरही बराच वेळ हलक्या सरी सुरू होत्या.
शहरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जूनच्या सुरुवातीलाच वादळी वा-यासह सलग दोनतीन दिवस झालेल्या त्या पावसाने नगरकरांची दाणादाणही उडवली. या काळात शहरात मोठे नुकसानही झाले. मात्र मान्सूनच्या पावसाने दडी मारली होती. गेल्या काही दिवसांपासून केवळ ढगाळ हवामान होते, मात्र पावसाची प्रतीक्षा होती. ती आज संपली. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. केडगाव, सावेडी, औरंगाबाद रस्ता या उपनगरी भागात मात्र त्याने पाठ फिरवली. येथे पाऊस झालाच नाही.
गेल्या तीनचार दिवसांपासून शहरात अधूनमधून ढगाळ हवामान येते. आजही सकाळपासून ऊन-ढगांचा खेळ सुरू होता. हवेतील उष्णताही वाढली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आकाश काळोखून सुरुवातीला काही वेळ वारेही वाहिले, मात्र काही वेळातच पावसाला सुरुवात होऊन वारे थांबले. त्यानंतर सुमारे तासभर शहर व परिसरात दमदार पाऊस झाला. मधल्या काही वेळात त्याचा जोर चांगलाच होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला, मात्र त्यानंतरही हलक्या सरी सुरूच होत्या. सुमारे तासभर झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण होईल असे वाटत होते, मात्र त्यानंतर उष्णता आणखी वाढली. सायंकाळनंतरही पुन्हा पावसाची चिन्हे होती.
शहर व परिसरात मान्सूनचे आगमन झाले असले तरी जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली असून मृग नक्षत्रातील पावसानंतर जिल्हय़ात खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होतो, मात्र आता मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाची प्रतीक्षा संपलेली नाही. त्यामुळे पेरण्याही आता खोळंबल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 3:01 am

Web Title: heavy rain of monsoon in nagar 2
Next Stories
1 चुकीच्या नोंदी घेऊन गारपीटग्रस्त निधीवाटपात गैरप्रकार
2 दोघांनी परस्परांच्या श्रीमुखात भडकावली!
3 नगर शहरासाठी महिनाभराचाच पाणीसाठा
Just Now!
X