24 November 2017

News Flash

बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, नदीला पूर

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्य़ात पावसाने जोरदार हजेरी लावली असून बिंदुसरा नदीला पूर आला आहे

वार्ताबर, बीड | Updated: September 10, 2017 3:42 AM

बिंदुसरा नदीला आलेला पूर.

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्य़ात पावसाने जोरदार हजेरी लावली असून बिंदुसरा नदीला पूर आला आहे. या नदीवरील पुलावरून पाणी जाऊ लागल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे .

जिल्ह्यत आज पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी सात महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीनंतर दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी दुपारी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक ठिकाणच्या सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. बिंदुसरा प्रकल्प क्षेत्रांमध्येही झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता. नदी दुथडी भरुन वाहिल्याने शहरातील  छोटय़ा पुलावरून पाणी वाहत होते. नदीच्या पाण्यात एक मालवाहू टेम्पो अडकला असून चालक व क्लिनर सुखरूप बाहेर पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पूल वर्षभरापासून वाहतुकीस बंद असल्याने मोठी आणि छोटी वाहने शहरातील रस्त्यांवरून वळविण्यात आली आहेत .दोन दिवस झालेल्या पावसाने शनिवारी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.

मोठय़ा आणि छोटय़ा पुलावरून वाहने बंद करण्यात आल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी  झाली होती. शहरातील रस्त्यांवरही दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सखल भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.

सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये बीड ३.८२ , पाटोदा १.७५, गेवराई २.९०, माजलगाव ३४, केज २६, धारूर १५, परळी ९, अंबाजोगाई १६, वडवणी तालुक्यात १८ मि.मी. पाऊस झाला आहे.

 

 

First Published on September 10, 2017 3:42 am

Web Title: heavy rain on second consecutive day in beed