मागील काही तासांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम आहे. गणरायाच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या भक्तांनाही पावसाने खरेदीची मूभा दिली नाही. शुक्रवारी पावसाचा जोर कायम राहिला. त्याचबरोबर पुढील चार दिवसही मुंबई, कोकणासह राज्याच्या इतर काही भागात पावसाच धूमशान सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. २५ ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज असून, मुंबईत प्रशासनाला सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून पावसानं मुंबईसह जवळच्या जिल्ह्यांमध्ये मुक्काम ठोकला असून, संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले असताना एक दिवस आधीच अर्थात शुक्रवारपासून मुंबईत पावसानं जोर धरला आहे. मुंबई जोरदार पाऊस सुरू असून, हवामान विभागानं २५ ऑगस्टपर्यंतचा अंदाज जाहीर केला आहे.

२५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून, मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाला सर्तक राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी (२१ ऑगस्ट) बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे लगबग सुरू असताना जोर धरलेल्या पावसानं खरेदीची उसंत दिली नाही. त्यामुळे पावसातच मुंबईकरांना खरेदी उरकावी लागली. मुंबईत मागील २४ तासात दहिसर येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दहिसर येथे २०९ मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली असून, कल्याण-डोंबिवलीमध्ये २४ तासांत पावसाचा जोर अधिक बघायला मिळाला. विशेषतः उत्तर मुंबईत पावसाचा जास्त दिसून आला.