News Flash

परभणी जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर, ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी

शेकडो हेक्टरखालील पिके पाण्याखाली

शेकडो हेक्टरखालील पिके पाण्याखाली

औरंगाबाद : जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गोदावरी, दुधना या मुख्य नद्यांसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आजारी व्यक्तींना उपचारार्थ गावाबाहेर घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

काल बुधवारी (दि.२१) जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. दिवसभर पाऊस कोसळतच होता. आज दिवसभरही जिल्ह्यात पावसाने संततधार लावली. सेलू तालुक्यातील मुख्य रस्ते बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. लोअर दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दुधना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ११ जुलैला रविवारी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे तब्बल १७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. १४ जुलैला १० मंडळात, १५ जुलैला ३१ मंडळात आणि आज गुरुवारी ३२ मंडळात अतिवृष्टी  झाल्याची नोंद आहे.

पालम तालुक्यातील गळाटी, लेंडी या नंद्यांना पूर आल्याने १४ गावांचा संपर्क तुटला आहे. आरखेड, पुयणी, आडगाव, फळा, फरकंडा, घोडा, वनभुजवाडी या गावांच्या शिवारामध्ये  पुराचे पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झालेच, तर रस्त्यांचाही संपर्क तुटला. सेलू तालुक्यात पावसाच्या पाण्याचा ओघ सुरूच असल्याने लोअर दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. जिल्ह्यात करपरा नदीला पूर आल्याने परभणी-जिंतूर हा महामार्ग बंद झाला तर मानवत तालुक्यातील किन्होळा येथील वळण रस्ता पुन्हा पाण्यात गेल्याने परभणी-पाथरी, मानवत रोड  आदी रस्त्यावरील वाहतूक  बंद झाली.

दुधना नदीला पूर आल्याने झरी, मांडवा, जलालपूर, संबर अशा अनेक गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला. पूर्णा तालुक्यातही गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे.  नद्यांना पूर आल्याने आहेरवाडी, वडगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. पूर्णा तालुक्यातील अंतर्गत रस्तेही ठप्प झाले. आहेरवाडी या गावाला संपूर्ण दिवसभर पाण्याचा वेढा होता, तर मानवत तालुक्यातील मगरसावंगी या गावालाही पुराच्या पाण्याने वेढले. लोअर दुधना प्रकल्पातला विसर्ग दुधना नदी पात्रात सोडण्यात आल्याने पावसाचा वेग वाढला, तर दुधनाकाठच्या सर्वच गावांना पुराचा धोका असल्याचे चित्र आहे. दरम्यान या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके पुन्हा संकटात सापडली आहेत. शेतातून पाण्याचा निचराच होत नसल्याने आणि जिल्ह्यातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली असल्याने खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. पहिल्या अतिवृष्टीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असताना आता पुन्हा दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने प्रशासनासमोरही नवे आव्हान निर्माण झाले आहे.

दुसऱ्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश

जिल्ह्यात रविवारी (दि.११) झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. आज पुन्हा ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात शेकडो हेक्टर  पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे या ठिकाणचे पाणी ओसरेपर्यंत पंचनाम्यासाठी गावपातळीवरील यंत्रणेला जाता येत नाही. पाणी ओसरल्याबरोबर सर्वच ठिकाणचे पंचनामे तातडीने करण्यात येतील. महसूल यंत्रणेला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी, रस्ते व पूल खचल्याच्या घटना अशा सर्वच बाबींचे पंचनामे हाती घेण्यात आले आहेत.

दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी

लातूरमध्ये पाऊसधारा!

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहरवासीयांना सूर्यदर्शन झाले नाही व पावसाच्या सरीवर सरी बरसत आहेत. बुधवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. रात्रभर भीज पाऊस सुरू राहिला. हा पाऊस संपूर्ण जिल्हाभर सर्वदूर होता.जुलै महिन्यात अजिबात उसंत न घेता कमी-अधिक प्रमाणात रोजच पावसाची हजेरी आहे. सततच्या पावसाने आता शेतकरी कंटाळला असून, थोडी उसंत दे रे बाबा, अशी प्रार्थना शेतकरी करतो आहे.बुधवारी रात्री झालेल्या पावसाने भूजलाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. नदी-नाले, ओढे वाहत आहेत. अहमदपूर तालुक्यातील खंडाळी मंडळात ७०.३ तर उदगीर मंडळात नळगीर मंडळात ७३.५ मि.मी. इतका पाऊस केवळ २४ तासांत झाला आहे. दहाही तालुक्यांत दमदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत सरासरी ३४.१ मि.मी. इतका पाऊस झाला असून या मोसमातील एकूण पाऊस ४१७.४ मि.मी. झाला आहे. वार्षिक सरासरीच्या ६५.१ टक्के तर अपेक्षित सरासरीच्या १६६.३ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.

 

परभणी जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:05 am

Web Title: heavy rainfall causes floods in parbhani district zws 70
Next Stories
1 रायगडमध्ये जोखीम पत्करून वर्षासहली
2 वन्य प्राण्याच्या हल्लय़ात घोडी ठार
3 शिवसेनेतर्फे राज्यस्तरीय संपर्क अभियान
Just Now!
X