कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अपेक्षेप्रमाणे मध्य भारताकडे सरकले आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. कोकणासह मुंबई, ठाण्यात रविवारी संततधार पाऊस होता. सोमवार, १६ जुलैला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रापासून केरळपर्यंत समुद्र किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये गेल्या आठवडय़ात कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाला होता. मात्र, १३ जुलैपासून या भागातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने राज्यातील पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीलगत कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण होऊन ते उत्तर भारताच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे राज्यात पावसाने जोर धारला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. १८ आणि १९ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

नाशिक : शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांमध्ये शनिवारपासून पावसाचा जोर वाढला असून रविवारी गोदावरीच्या पाणी पातळीत यंदा प्रथमच वाढ झाली. रामकुंड, गांधी तलाव पाण्याखाली गेले आहे. नदीपात्रात पाणी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठालगतच्या रहिवाशांना आणि विक्रेत्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

पाऊसभान : गेल्या २४ तासांत राज्यातील घाटमाथा परिसर, कोकण, विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली. प्रमुख  ठिकाणी पडलेला पाऊस (मि. मी.) पुढीलप्रमाणे :  जव्हार, माथेरान, मोखाडा १७०, विक्रमगड १४०, भिरा १३०, संगमेश्वर, देवरुख १२०, लांजा, तलासरी ११०, पालघर १००, उल्हासनगर ९०, कणकवली, मुरबाड ८०,  ठाणे ४०, मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी १५०, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर १३०, राधानगरी १२०, त्र्यंबकेश्वर १००, चांदगड, पेठ ९०, अजरा, हरसूल ८०, मराठवाडय़ातील औंढा-नागनाथ, कंधार ५०, अहमदपूर, सेनगाव ४०, बदलापूर, हिंगोली, जालना, कळमनुरी, परतूर, उमरगा ३०, विदर्भातील आमगाव ७०, गोंदिया ६०, मेहकर, रिसोड, सालकेसा, वाशिम ४०, अमरावती, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, गोरेगाव, लोणार, मालेगाव ३०, घाटमाथा परिसरातील ताम्हिणी २४०, शिरगाव २१०, दावडी १९०, डुंगरवाडी, ठाकूरवाडी १८०, कोयना (नवजा) १५०, अम्बोणे १४०.