तब्बल २० दिवस उशिराने कोकणात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे भातशेतीला जीवदान मिळाले आहे. रायगड जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाने चांगला जोर धरण्यास सुरुवात केल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

राज्यात दरवर्षी कोकणातून दाखल होणारा मान्सून यंदा विदर्भातून दाखल झाला. मात्र दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला दाखल होणारा मान्सून यावर्षी तब्बल १८ ते २० दिवस उशिराने दाखल झाला. उशिरा आलेला मॉन्सून आता कोकणात स्थिरावण्यास सुरुवात झाली आहे. पावासाचा जोर दिवसागणीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्य़ात दरवर्षीप्रमाणे पाऊस बरसत नसला तरी नियमित पावसाच्या सरीने शेतीला जीवदान दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरचे दुबार पेरणीचे संकट सध्या तरी टळले आहे.

रायगड जिल्ह्य़ात खरीपाचे १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापकी दरवर्षी साधारणपणे १ लाख २० हजार हेक्टरवर लागवड केली जाते. यात प्रामुख्याने भात पिकाच्या १ लाख १६ हजार हेक्टरचा समावेश असतो.

जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्य़ात पेरणी केली जाते. दक्षिण रायगडात काही ठिकाणी धूळपेरणी पद्धतीचा तर उर्वरित भागात गादीवाफा पद्धतीचा वापर केला जातो.

सुरुवातीला भातलागवडीसाठी १० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करून भात पिकाचे गादीवाफे तयार केले जातात आणि नंतर रोप तयार झाल्यावर त्यांची १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रांत लागवड केली जात असते. सालाबादप्रमाणे यावर्षी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणीची काम पूर्ण केली, पण मान्सून सक्रिय होण्यास उशीर झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. पण १९ जूननंतर पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भातपिकाला जीवदान मिळाले आहे. नेहमीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असले तरी ते शेतीला पुरेसे असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

येत्या तीन-चार दिवसांत जिल्ह्य़ात सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे भात पिकासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चिखलणीची कामे सुरू करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतातील पाणी काढून टाकावे आणि खत फवारणी सुरू करावी, असा सल्ला कृषी अधीक्षक के. बी. तरकसे यांनी दिला आहे.

जिल्ह्य़ात ३१ हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यावर्षी भाताला कापणीनंतर १४ दिवस पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन तरकसे यांनी केले आहे. खत आणि बियाण्यांसंदर्भात तक्रारी असतील तर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.