जिल्ह्यतील अनेक भागात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अर्धा ते पाऊण तास पावसाने झोडपले. नाशिक शहर व मालेगाव येथे गाराही पडल्या. वाऱ्यामुळे अनेक भागात झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला. मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन जण ठार झाले तर धुळ्याच्या साक्री तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दोघांचा बळी घेतला.
नाशिक शहर, मालेगाव, मनमाडसह अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह रोहिणी नक्षत्राच्या तडाखेबंद पाऊस झाला. नाशिक, मालेगावमध्ये गाराही पडल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. मध्यवर्ती बाजारपेठेत झाड कोसळून चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने त्यात जिवितहानी झाली नाही. कोसळलेल्या झाडांचा फटका वीज पुरवठय़ाला बसला. वीज तारा तुटल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. अल्पावधीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदा पात्रासह अनेक सखल भागात पाणी साचले. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. मालेगाव व मनमाड येथे उकाडय़ाने नागरिक हैराण होते. चार वाजेच्या सुमारास पावसाने तासभर हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात तळे साचले. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मालेगाव तालुक्यात वीज कोसळून टोकडे गावातील समाधान बहादुरसिंग सुमराव (३०) आणि गरबड येथील सुनंदा दिनकर गायकवाड (३२) यांचा मृत्यू झाला. गरबड येथील सावित्री योगेश माळी हे जखमी झाले. वीज पडून दहा जनावरांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पावसाने दोघांचा बळी घेतला. वेहरेगाव येथे पावसात घराचे छत अंगावर पडल्याने मुक्ताबाई दशरथ शिंदे (६५) यांचा मृत्यू झाला तर विटावे शिवारात वीज पडून जगा लाल्या ठाकरे (६०) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 1:33 am